Nagpur Covid Update : प्रवास करुन आलेलेच बाधित, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 355वर
राज्यासह नागपूरही कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शु्क्रवारी जिल्ह्यात 65 नवीन बाधितांची नोंद झाली. यासह जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 355वर पोहोचली आहे.
नागपूरः एकीकडे देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई, दिल्ली प्रवासकरुन आलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहे, हे विशेष.
शुक्रवारी शहरात 46 आणि ग्रामीणमध्ये 19 असे एकूण 65 नवे बाधित आढळून आले. यासोबतच जिल्ह्यातील सक्रीय बाधितसंख्या 355वर पोहोचली आहे. आज शुक्रवारी ग्रामीणमध्ये 346 आणि 1208 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तसेच एकूण 345 अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या.
सध्या 355 रुग्णांपैकी 351 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर 4 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात भरती रुग्णांपैकी 1 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालया, 1 रुग्ण सेव्हन स्टार, किंग्सवे हॉस्पिटलमध्ये 1 आणि रेल्वे रुग्णालयात एक रुग्ण उपचार घेत आहे.
आज शुक्रवारी ग्रामीणमध्ये 26 आणि शहरात 34 रुग्णांनी म्हणजेच एकूण 60 बाधितांनी कोरोनावर मात केली.
मुंबई, दिल्लीच्या प्रवाशांनी वाढविली चिंता
प्राप्त माहितीनुसार वाढलेल्या रुग्णांमध्ये मुंबई, दिल्ली आणि उत्तराखंड राज्यांतर्गत प्रवास केलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. याचे प्रमाणही 50 टक्क्यांच्या घरात आहे हे विशेष.
शनिवारी मनपा केंद्रांमध्ये केवळ कोर्बेव्हॅक्स उपलब्ध
नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी 25 जून, 2022 रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोर्बेव्हॅक्स लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे.
लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.
राज्यात 4205 नवे कोरोनाबाधित
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 4205 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात आज 3752 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77,81,232 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या आषाढी वारी सुरू असून लाखो भाविक भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. मात्र, त्याच वेळी राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली असून दोन महिन्यांपूर्वीच्या केवळ 626 सक्रिय रुग्णांवरून ही संख्या 25 हजारा पर्यंत पोहचली आहे.