(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाणेकरांकडून खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक दिवाळी साजरी, यावर्षी सर्वात कमी प्रदूषण
ठाणे महानगरपालिकेच्या आवाहनाला ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यंदा ठाणेकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर दिला आहे.
ठाणे : ठाण्यातील नागरिकांनी दिवाळी सणाचे पावित्र्य राखत सामाजिक भान ठेवून ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी केली. ठाणे महानगरपालिकेच्या आवाहनाला ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यंदा ठाणेकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर दिला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने दीपावली पूर्व व दीपावली कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. त्यानुसार 7 नोव्हेंबर 2020 रोजी दीपावलीपूर्व कालावधीत 24 तासांकरिता हवेतील धुलिकणांचे प्रमाण 126 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते. नायट्रोजन ऑक्साईड वायुचे प्रमाण 34 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर सल्फरडाय ॲाक्साईड या वायूचे प्रमाण 24 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके आढळले होते.
त्याचप्रमाणे ध्वनीची अधिकतम तीव्रता 69 डेसिबल इतकी नोंदविण्यात आली होती. तर 14 नोव्हेंबर 2020 रोजी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी 24 तासांकरिता हवेतील तरंगते धुलिकणांचे प्रमाण 133 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते आणि नायट्रोजन ॲाक्साईड या वायूचे प्रमाण 37 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर सल्फरडाय ॲाक्साईडचे प्रमाण 29 मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके आढळले आहे. तसेच ध्वनीची अधिकतम तीव्रता 72 डेसिबल इतकी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे दीपावली कालावधीत मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा हवा प्रदूषणात आणि ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे असे दिसून आले आहे. 2018 व 2019 च्या तुलनेत यंदा दिवाळीच्या दरम्यान हवेतील धुलीकणांचे प्रमाण 44 टक्केपर्यंत कमी आढळले आहे तर ध्वनी पातळीत 21 ते 29 टक्क्यांपर्यंत घट झालेली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक देखील सुधारला असून त्यात 37 पर्यंत सुधारणा झालेली आहे. यावरून ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे.