रेरा फसवणूक प्रकरणी एका महिलेस पाच जणांना अटक, न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी
Maharashtra Kalyan News : कल्याण डोंबिवली महापालिका व पालिका अधिकार्याच्या नावाने खोटी सही शिक्के तयार करुन इमारतीच्या परवानगी भासवून रेरा प्राधिकरणचे प्रमाणपत्र मिळविल्या प्रकरणी एसआयटीने संबंधित कागदपत्र बनवणार्यासह बिल्डर विरोधात फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे.
Maharashtra Kalyan News : कल्याण डोंबिवली महापालिका व पालिका अधिकार्याच्या नावाने खोटी सही शिक्के तयार करुन इमारतीच्या परवानगी भासवून रेरा प्राधिकरणचे प्रमाणपत्र मिळविल्या प्रकरणी एसआयटीने संबंधित कागदपत्र बनवणार्यासह बिल्डर विरोधात फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी एसआयटीने खोटी कागदपत्रे तयार करणार्या एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. प्रियंका रावराणे मयेकर, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन, कैलास गावडे अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे कथित बिल्डर मंडळींचे धाबे दणाणले असून लवकर या प्रकरणाचा सूत्रधार व त्याचे साथीदार बिल्डरांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोट्या सही शिक्क्याच्या आधारे बांधकाम परवानगी मिळाली असल्याचे भासवून काही बिल्डरांनी रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रकल्पांचे प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी उघडकीस आला होता. महापलिकेने या प्रकरणात डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मधील तब्बल 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासाकरीता पोलिस आयुक्तांनी एसआयटी नेमली. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरु असताना सात बिल्डरांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी चार जणांचा अर्ज फेटाळला. तीन जणांना तीन आठवड्याकरता अंतिम जामीन मंजूर केला होता. मात्र एसआयटीने 65 पैकी 40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया नुकतीच केली होती. त्यानंतर खोटी कागदपत्र तयार करणाऱ्या प्रियंका रावराणे मयेकर, प्रवीण ताम्हणकर,राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन, कैलास गावडे अशी या आरोपींना एसआयटीने अटक केली होती. आज या पाच आरोपींना एसआयटी टीमचे प्रमुख एसीपी सरदार पाटील आणि पोलिस अधिकारी संपत पडवळ यांच्या पथकाने कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या पाचही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयात बचाव पक्षाच्या वकिलांकडून अनेक मुद्दे मांडण्यात आले. मात्र पुढील तपासाकरीता कोर्टाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. या तपासा दरम्यान एसआयटी टीम या पाच आरोपींचे आणखी कुणी साथीदार आहेत का याच शोध घेत आहेत. काही मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी पोलिस अधिकारी संपत पडवळ यांनी आमचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. नागरीकांनी बनावटीकरणापासून सावध राहावे. असा काही प्रकार घडत असल्यास त्याची माहिती पोलिस तपास पथकाला द्यावी, असे आवाहन केलं.
इतर महत्वाची बातमी:
कल्याण डोंबिवली रेरा प्रकरण; 40 बिल्डरांची बँक खाती गोठवली, SIT ची कारवाई