Thane Traffic Jam : कळवा नाका येथील वाहतूक कोंडीमुळे ठाणे जॅम
Thane Traffic Jam : आज देखील कळवा पुलावरील अरुंद रस्त्यामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी झाली आहे, मात्र ठाणे महापालिकेला याची जाणीव नाही.
Thane Traffic Jam : ठाण्यात (Thane) रोजच वाहतूक कोंडी होत आहे. माजिवडा नाका, घोडबंदर रोड, कळवा पुल हे रस्ते वाहतूक कोंडीचे इपी सेंटर झालेत. त्यापैकी कळवा नाका आणि साकेत रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) तिसरा कळवा खाडी पूल बांधण्यास 2014 मध्ये सुरुवात केली. इतक्या वर्षात या पुलाची एकच मार्गिका बांधून तयार झाली आहे. मात्र ही मार्गिका देखील वाहतुकीसाठी सुरु करण्यात येत नसल्याने महानगरपालिका कोणाची वाट बघत आहे असा प्रश्न पडला आहे. आज देखील कळवा पुलावरील अरुंद रस्त्यामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी झाली आहे, मात्र ठाणे महापालिकेला याची जाणीव नाही.
कळवा खाडीवर ब्रिटिशकालीन पूल बंद करण्यात आल्यानंतर 1995 साली दुसरा खाडी पूल बांधण्यात आला. परिणामी वाहतुकीचा संपूर्ण ताण या सध्याच्या पुलावर येत आहे. हा पूल देखील वाढलेल्या वाहन संख्येमुळे अपुरा पडत असल्यामुळे तिसरा खाडी पूल बांधण्यासाठी सुरुवात करण्यात आली. 183 कोटी रुपये खर्च हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. या पुलाच्या विविध मार्गिका आहेत. त्यापैकी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इथून कळवा नाका आणि ठाणे बेलापूर रस्त्याला जोडणारी एक मार्गिका आता पूर्ण झाली आहे. पुलावरील ताण कमी करण्यासाठी मार्गिका सुरु करण्याची मागणी केली जात आहे. मात्र अजूनही काम अपुरे असल्याचा बहाणा देत ठाणे महानगरपालिकेने या मार्गिकेचे उद्घाटन केले नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे महानगरपालिका या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी कोणाच्या अपॉइंटमेंटची वाट बघते हा प्रश्न विचारला जात आहे.
कोंडीमुळे नागरिक बेजार, ठाणे मनपाला कोणाची प्रतीक्षा?
ठाणे-कळवा दरम्यान तिसऱ्या पुलाच्या एका मार्गिकेचं बांधकाम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही मार्गिका आता बांधून तयार झाली आहे. ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केल्यावर ठाणे-कळवा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. परंतु ठाणे महापालिकेने ती वाहतुकीसाठी खुली केलेली नाही.
ठाणे-कळवा खाडीदरम्यानच्या सध्याच्या एका पुलावर संपूर्ण वाहतुकीचा ताण येत असून त्यामुळे कळवा आणि ठाणे दोन्ही दिशेला वाहतूक कोंडी होत आहे. ठाण्यातून नवी मुंबईकडे जाण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूक आणि सकाळी ठाणे स्टेशनमध्ये येण्यासाठी कळव्यातील वाहनांच्या रांगा दुतर्फा लागलेल्या असतात. पुलाच्या रखडपट्टीमुळे कळवा नाक्यावरील कोंडीमुळे नागरिक बेजार झाले आहेत.
Thane Traffic : ठाणेकर वाहतूक कोंडीने हैराण, अपूर्ण कामामुळे कळवा पुलावर दररोज वाहतूक कोंडी