मुंबई-नाशिक महामार्गाची चाळण, वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांसाठी बाळ्यामामा अॅक्शन मोडमध्ये
भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सोमवारी मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद,आसनगाव ते शहापूर पर्यंतच्या मार्गाची पाहणी केली.
ठाणे : मुंबई- नाशिक महामार्गावरील (Mumbai- Nashik Highway) वाहतूक कोंडीची (Traffic) समस्या गंभीर बनली असून या वाहतूक कोंडीत प्रवाशांसह नागरिकांना तासतास अडकावे लागत आहे. त्याचबरोबर या महामार्गावर वाशिंद ते शहापूर मार्गावर सध्या प्रचंड खड्डे पडले असून खड्डेमय रस्त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सोमवारी मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद,आसनगाव ते शहापूर पर्यंतच्या मार्गाची पाहणी केली. यावेळी वाशिंद व आसनगाव या दोन ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या अपूर्ण कामांची देखील खासदार बाळ्यामामा यांनी पाहणी केली. यावेळेस ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे उड्डाणपुलाचे संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे कंत्राटदारांना खडे बोल सुनावले व उड्डाणपूलाची आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दूरावस्था (Potholes) झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर (Mumbai Nashik High way) तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे, यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा कालावधी लागत आहे. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून या महामार्गाला मुक्त करण्याची मागणी कायम होत असते.
वारंवार वाहतूक कोंडीचा सामना
मुंबई-नाशिक महामार्ग हा राज्यातला महत्वाचा मार्ग आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळ्यापासून या महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची मोठी दूरावस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास
रस्त्यांवरील खड्यांमुळे मणक्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. ठाणे शहरातील साकेत ब्रीजच्या रखडलेल्या कामामुळे तर या वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रदुषणात भर पडत आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत, असं नागरिक म्हणाले.
हे ही वाचा :