(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shilphata Road : शिळ रोडला पुन्हा नवीन डेडलाईन, वाहनचालक वाहतूक कोंडीने त्रस्त
Kalyan - Shilphata Road : कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहरातील नागरिकांना मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर कल्याण शिळ रोड हा महत्वाचा रस्ता आहे.
Kalyan - Shilphata Road : कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहरातील नागरिकांना मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर कल्याण शिळ रोड हा महत्वाचा रस्ता आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या रस्त्यानं प्रवास करणाऱ्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना मुंबई,नवी मुंबईकडे जाण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण शीळ रोडचा प्रवास सुकर व्हावा यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र चार वर्षे उलटल्यानंतरही रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. कधी भूसंपादणासाठी होणारा विरोध तर कधी पावसाचे कारण दिले जात असून या रस्त्याच्या डेडलाईनसाठी तारीख पे तारीख सुरु आहे. मात्र यात सुकर प्रवासाचे स्वप्न प्रवाशांपासून लांबच पळत आहे. आता नव्याने या कामासाठी निधी वाढवून देतानाच 2023 मार्चची मुदत ठरविण्यात आली आहे. मात्र या कालावधीत हा रस्ता पूर्ण होणार का? असा प्रश्न नागरिकाकडून विचारलं जात आहे.
कल्याण शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 21 किमी लांबीचा भिवंडी ( रांजनोली नाका ) ते कल्याण शिळ फाटा रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण काम प्रस्तावित आहे. 16 ऑगस्ट 2018 पासून या रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाबरोबरच पत्रीपुलाला समांतर उड्डाण पूल, काटई येथे 2 रेल्वे उड्डाण पूलाचा समावेश असून रस्त्याखालून जाणाऱ्या विद्युत तसेच जल वाहिन्या स्थलांतरीत करण्याच्या कामाचा समावेश आहे.
चार वर्षांपासून फक्त अश्वासन-
सुरुवातीला 30 महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र चार वर्षे उलटल्यानंतरही प्रशासनाकडून 80 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. पण शहरातील रस्त्यासह रस्त्यात ठिकठिकाणी कामे प्रलंबित आहेत. ही कामे पूर्ण करणासाठी शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाकडून निधी दीडपटीने वाढवून 561 कोटी 85 लाख इतका केला आहे. यातील 105 कोटी निधी आतापर्यंत राज्य शासनाने खर्च केला असून उर्वरित निधी शासनाच्या निधीतूनच दिला जाणार आहे.
रस्ता कोंडीमुक्त होईल?
नागरिकाकडून भूसंपादनास होणारा विरोध आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे कामाचा वेग मंदावल्याचे सांगत समांतर पत्रीपुलाचे काम 31 डिसेबर 2022 मध्ये तर संपूर्ण रस्त्याचे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या रस्त्याचे काम खरोखर पूर्ण झाल्यास वाहनचालकाची वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता होण्याची आशा आहे. ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा आहे, त्यामुळे यापुढे त्यांच्याच जिल्ह्यातील हा रस्त्याच्या कामाला वेग मिळेल आणि हा रस्ता कोंडीमुक्त होईल अशी अपेक्षा बाळगायला मात्र हरकत नाही.
टोल फ्री प्रवास -
एम.एस.आर.डी.सी चे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी यापूर्वी असलेल्या रस्त्यावरून जड वाहनाची वाहतूक बंद करण्यात आल्याने बीओटी ऐवजी भिवंडी- कल्याण शिळ हा 21 किमी लांबीचा रस्ता शासनाच्या 561 कोटी निधीतून होत आहे. या रस्त्यावरून टोल फ्री प्रवास करणे शक्य होईल. रस्त्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे तर भूसंपादनास विरोध झाल्याने 20 टक्के काम शिल्लक आहे. दुसरा पत्रीपुलाचा सांगाडा कंपनीत तयार आहे, मात्र पिलरसाठी रेल्वेच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यानंतर ही परवानगी अपेक्षित आहे. पावसामुळे कामात व्यत्यय येत असून रस्त्यासाठी 31 मार्च तर पुलासाठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आल्याचे सांगितले.