(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पत्रीपुलाचं उद्घाटन, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका, म्हणाले, अडथळे दूर होणे महत्वाचे
कल्याण शिळफाटा मार्गावरील वाहतुकीसाठी पत्रीपुलाचे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन झालं.अडथळे आणायचे आणि काम झाली नाहीत म्हणून नावं ठेवायची अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा
कल्याण : कल्याण शिळफाटा मार्गावरील वाहतुकीसाठी पत्रीपुलाचे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उद्घाटन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, केंद्राच्या अनेक संस्थांकडे राज्याची कामे अडकून आहेत. एकीकडे अडथळ्यांची शर्यत करायची आणि मग आपली गती मोजायची अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. कल्याणातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा नविन पत्रीपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईन करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, काम करताना एखाद्याच्या तंगड्यात तंगडं घालून पुढे जाऊ द्यायचे नाही आणि दुसरीकडे नावंही ठेवायची. नावं ठेवणं ही सोपी गोष्ट असून अशा व्यक्तींनी आपले नाव कशाला दिले जाईल का? आपले पुढे काय होणार याचाही विचार केला पाहिजे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, विकासकामे मग ती केंद्राची असो की राज्य सरकारची. त्यातील अडथळे दूर होणे महत्त्वाचे आहे. तर नवीन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी एमएसआरडीसी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत अत्यंत उपयोगी काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तर या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही आपल्याला विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिले.
कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. कल्याण स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पामुळे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व नियोजनबध्द पध्दतीने होईल आणि बसेस, रिक्षा, खाजगी वाहनांमुळे कल्याण स्थानक परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवत स्थानक परिसरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
कल्याण शिळफाटा मार्गावरील वाहतुकीसाठी पत्रीपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये तो पाडण्यात आला. त्यानंतर तीन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात दिले होते. त्यानंतर अनेक कारणांमुळे काम रेंगाळले होते.