Kalyan : हनुमान नगर परिसरात दरड कोसळली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Kalyan Latest Rain Update : कल्याण पूर्वेकडील हनुमान नगर परिसरात दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी नाही. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
Kalyan Latest Rain Update : पाच दिवसांपासून कल्याण आणि परिसरात मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. धुंवाधार पावसामध्येच कल्याण पूर्वेकडील कचोरे हनुमान नगर परिसरात असलेल्या टेकडीवरून काही दगड निसटल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. हनुमान नगर टेकडी परिसरात दाट लोकसंख्या आहे. टेकडी लगतच तीस ते पस्तीस घरं आहेत. सुदैवाने या टेकडी लगत लोखंडाची रेलिंग करण्यात आली आहे. त्यामुळे ही टेकडीवरून निसटलेले मोठे दगड रेलिंग वर अडकले अन्यथा मोठे दुर्घटना घडली असती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.
गेल्या आठवड्यात देखील अशीच घटना या परिसरात घडली होती. घटनेची माहिती मिळताच तातडीने कल्याण डोंबिवली महापालिकेचे आपत्कालीन पथक अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. तसेच महापालिकेकडून या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, लोखंडी रेलिंगची केलेली उपाययोजना हे तात्पुरती आहे, या परिसरामध्ये रिटर्निंग संरक्षक भिंतीची मागणी गेली अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक नगरसेवकांकडून केली जातेय. यासाठी निधीदेखील मंजूर करण्यात आला. मात्र महापालिका दुर्लक्ष करत असून संरक्षण भिंतीचं काम सुरू करण्यात आलं नसल्याचा आरोप येथील नागरिकानी केला आहे.
केडीएमसीच्या सिटी पार्क प्रकल्पाच्या परिसरात शिरले पाणी -
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील गौरीपाडा परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिटी पार्क उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या परिसरात जोरदार पावसामुळे पाणी शिरले आहे. प्रकल्पाच्या परिसरात पाणी शिरले असले तरी प्रकल्पाच्या कामाचे नुकसान झाले नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या पार्क मध्ये हजारोंच्या संख्येत झाडे लावण्यात आली आहेत. पाणी वाढलं तर या झाडांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचा खर्च असलेल्या या प्रकल्पाचं पहिल्या टप्पयातील काम सुरू आहे. गेल्या वर्षी देखील अतिवृष्टीचा फटका सिटी पार्कच्या कामाला बसला होता. तेव्हा प्रकल्पाच्या कामाचे नुकसान झाले होते. आत्ता पुन्हा जोरदार पावसाचा फटका प्रकल्पला बसला आहे.