Ganpat Gaikwad : आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, जागेच्या वादावरुन कारवाई
Ganpat Gaikwad : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या जागेवरुन हा वाद झाला त्या जागेच्या मालकाने ही तक्रार केली.
मुंबई : जागेच्या वादातून उल्हासनगर (Ulhasnagar) पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या प्रकणार आमदार गायकवाड यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आलीये. दरम्यान जागेच्या वादावरुन हा गोळीबार करण्यात आला अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या आठ जणांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा जागा मालकाच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता गणपत गायकवाड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात 31 जानेवारी रोजी एका जागेवरुन वाद झाला. जागा मालकाच्या कुटुंबियांसोबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा वाद झाला होता. यावेळी नआमदारांसह सात जणांनी जागा मालक मधूमती एकनाथ जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केला. त्यांच्या जातीचा उल्लेख करत तुमची जमीन घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असं गणपत गायकवाडांनी म्हटल्याचं यावेळी या महिलांनी सांगितला. तुम्ही तुमच्या जमीनीकरिता कोणत्याही कोर्टात जा असं बोलून पाणउतारा केल्याचं देखील यावेळी या महिलांनी सांगितलं.
या प्रकरणात हिललाईन पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीख, वि्ठठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल ,मंगेश वारघेट यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आमदार गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले. या वादातून आमदार गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख गहेश गायकवाड पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात चर्चा सुरु होती. या चर्चेच्या दरम्यान पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमध्ये आमदारांनी महेश गायकवाड यांच्यासह त्याची साथीदार राहुल पाटील याच्यावर गोळ्या झाडल्या.
गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. पण अवघ्या काही मिनिटांत गणपत गायकवाड यांना कोर्टातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर ही सुनावणी घेण्यात आली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर गणपत गायकवाड यांची बंदूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे, असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं. पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली, त्यानंतर कोर्टाने त्यांचा निकाल हा राखून ठेवला होता.
ही बातमी वाचा :
Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?