महिंद्राच्या गाड्यांच्या किंमतीत वाढ, पिकअप ते SUV च्या किंमतीत 'इतकी' वाढ
भारतातील ऑटो उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या महिंद्राने (Mahindra) आपल्या पिकअप ते SUV या सर्व गाड्यांच्या किंमतीत 1.9 टक्क्यांनी वाढ केली आहे. (Mahindra Car Price Hike by 1.9 percent).
मुंबई: भारतातील वाहन निर्मितीतील अग्रगण्य असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने आपल्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या किंमतीत 1.9 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीने शुक्रवारी जाहीर केलेल्या आपल्या निवेदनात म्हटलंय की ही किंमत वाढ तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहे.
किती रुपयांची वाढ झाली? महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत 1.9 टक्क्यांची वाढ केल्याने वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता 4,500 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंतचा अधिकचा खर्च येणार आहे. ही वाढ कार, पिकअप किंवा अन्य वाहनांच्या किंमतीवर आधारित असणार आहे.
'या' आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार्स, GNCAP ने दिले 5 स्टार रेटिंग
किंमतीत का वाढ केली? कंपनीने आपल्या निवेदनात सांगितलंय की गेल्या काही दिवसांत वाहन निर्मिती क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वाहनांच्या उत्पादन खर्चावर होत आहे. याच कारणामुळे कंपनीने आठ जानेवारी 2021 पासून वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (वाहन) विजय नाकरा म्हणाले की, उत्पादन प्रक्रियेतील वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी कंपनीने पूर्ण प्रयत्न केले. परंतु कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Kia Sonet iMT Review: जाणून घ्या कोणत्या गोष्टींमुळे बनते ही कार स्पेशल?
किंमती वाढवण्याच्या या निर्णयामुळे महिंद्राची लोकप्रिय कार थार ची किंमत वाढली आहे. महिंद्रा थारच्या किंमतीत 20 ते 40 हजारांची वाढ होणार आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार 1 डिसेंबर 2020 ते 7 जानेवारी 2021 च्या दरम्यान बुक करण्यात आलेल्या नव्या थारच्या किंमतीतही वाढ करण्यात येणार आहे.
महिंद्रा कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ होणार असल्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. साधारण: ऑटो क्षेत्रातील कंपन्या प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करतात.