Devendra Fadnavis : फडणवीसांच्या स्वागताची जोरदार तयारी, स्कूटर रॅली, चौकांमध्येही होणार जल्लोष
विमानतळावरून निघाल्यानंतर विविध चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वागत केले जाणार आहे. स्कूटर रॅली लक्ष्मीभुवन चौकांत पोहोचेल आणि येथे रॅलीचा समारोप आणि सत्करा होणार आहे.

नागपूरः नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे उद्या मंडळवारी शहरात आगमन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळापासून धरमपेठ येथील निवास्थानापर्यंतच्या प्रत्येक चौकात पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात येणार आहे. विमानतळापासून स्कूटर रॅली काढण्यात येणार असून मोठ्या जल्लोषाची तयारी शहर व जिल्हा भाजपने केली आहे.
नव्या भाजप व शिंदे गट सरकारचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री शहरात पोहोचतील. त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी आज दिवसभर शहर भाजप, युवा मोर्चा अशा विविध आघाड्यांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. विमानतळापासून तर धरमपेठपर्यंत स्कूटर रॅली काढण्यात येणार आहे. विमानतळावरून निघाल्यानंतर छत्रपती चौकासह प्रत्येक चौकात त्यांचे स्वागत केले जाणार आहे. ही स्कूटर रॅली छत्रपती चौक, शंकरनगर चौक, कॉफी हाऊस चौक मार्गाने लक्ष्मीभूवन चौकात पोहोचणार आहे. लक्ष्मीभुवन चौकांमध्ये रॅलीचा समारोप होणार असून येथे त्यांच्या सत्कार समारंभ पार पडणार आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शहर व जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले आहे. या रॅलीत प्रदेश महासचिव आमदार चंद्रशेखर बावनकुळे, शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी महापौर संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील.
डॅमेज कंट्रोलसाठी इच्छुकांची फिल्डिंग
आगामी मनपा निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनीही चौकात चौकात बॅनर लावले आहे. तसेच कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. कोरोना काळात काही काम केले नसल्याने नागरिकांमध्ये असेली नाराजी दूर करुन एकदा पुन्हा भाजपचा माहोल तयार करण्याच्या प्रयत्न इच्छुकांकडून करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तरी पक्ष आणि लोकं हे जुनं विसरुन संधी देतील असा आशावाद अनेक इच्छुकांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.























