Solapur : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात तब्बल पावणे तीन कोटी रुपये अधिकचे वाटले
Solapur Latest News : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामात तब्बल दोन कोटी 74 लाख रुपये जमीन मालकांना अधिकचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे.
Solapur Latest News : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामात तब्बल दोन कोटी 74 लाख रुपये जमीन मालकांना अधिकचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अधिकची रक्कम वाटप केल्याचा अहवाल देखील समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ सांगली ते सोलापूर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे, हिरज, बेलाटी, बसवेश्वरनगर आणि देगांव या पाच गावांतील जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. या कामासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठिकाणी नियमानुसार जमिनीचे तीन कोटी 46 लाख रुपये मूल्यांकन होते. मात्र भूसंपादन अधिकाऱ्याने चुकीचे मूल्यांकन करत तब्बल 5 कोटी 78 लाख रुपये वाटप केले.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संदीप शितोळे यांनी लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तक्रारीत तथ्य असल्याचे म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी अधिकार पदाचा गैरवापर केल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सौरभ राव यांनी काढला आहे. याची सखोल तपासणी करण्याबाबतच्या सूचना देखील त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारीना दिल्या आहेत. दरम्यान या प्रकरणात उपविभागीय अधिकारी हेमंत निकम हेच दोषी असून अतिरिक्त वाटप करण्यात आलेली दोन कोटी रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार संदीप शितोळे यांनी केली आहे.
विभागीय आयुक्तांनी तक्रारदार शितोळे यांचा अर्ज, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांचे म्हणणे आणि तोंडी युक्तिवाद लक्षात घेऊन संबंधित प्रकाराचा सखोल चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. बसवेश्वर नगर येथील जमीन भूसंपादित करत असताना तेथील एकच दस्त क्रमांक दोन वेळा नमूद असल्यास नियमानुसार अनुसूची २ आणि दस्त मागणी करून, मूल्यांकन दर निश्चित करताना व्यवहार विचारात घेणे आवश्यक होते.
मात्र भूसंपादन प्रक्रिया पार पाडताना उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी चुकीचे मूल्यांकन काढले आहे. दस्तची फोड केल्यामुळे दर निश्चितच वाढले आहे. दस्त क्र. ३१२५/२०१६ मधील दोन वेगवेगळ्या गटाचे क्षेत्र ३८ लाख ७२ हजार रुपयाला खरेदी केले असल्याचे नमूद करून, चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन दर निश्चित केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे संबंधित जमीनमालकास दोन कोटी ७४ लाख पाच हजार ४०६ रुपये जास्त आदा करण्यात आले आहेत. जमिनीचे चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन दर निश्चित करून भूसंपादन रक्कम वाटप केल्याचा निष्कर्ष काढला आहे.
दरम्यान या प्रकरणात जादाचे दिलेले पैसे सध्या कोणत्या स्टेजला आहेत? संबंधिताच्या खात्यावर जमा केले का की आणखी बँक खात्यामध्येच आहे? याची माहिती उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडून मागवण्यात आली आहे. येणाऱ्या माहितीचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, अशी | माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माध्यमाना दिली आहे.