Jayant Patil : माझ्या भावाला ईडीची नोटीस पण त्याचा भेटीशी संबंध नाही; गुप्तभेटीबाबत जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण
Jayant Patil "माझ्या बंधुंना ईडीची नोटीस आली आहे पण त्याचा भेटीशी संबंध नाही," असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
पंढरपूर (Pandharpur) : "माझ्या बंधुंना ईडीची नोटीस आली आहे पण त्याचा भेटीशी संबंध नाही," असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. तसंच मी निघून गेलो, त्यानंतर काय झालं हे मला माहित नाही, असं जयंत पाटील म्हणाले. शिवाय या भेटीचा आणि ईडी नोटीसचा काही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं.
शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील यांच्यात पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आल्याने, त्यावर मार्ग काढण्यासंदर्भात चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. तसंच जयंत पाटील हे अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, असंही सूत्रांनी म्हटलं होतं. याबाबत विचारलं असता ही गुप्तभेट नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
आमची गुप्त भेट नव्हती
"कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होण्याचा प्रश्न नाही. लोक एकमेकांना भेटत असतात. विशेष सांगण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. ती गुप्तबैठक नव्हतीच ती. मी पवारसाहेबांसोबत गेलो आणि मी तिथून निघून आलो. बैठकीत काय झालं हे मला माहित नाही. बातम्या पेरल्या जातात असं मला वाटतंय. आता हे कोण करतंय ते तुम्हीच हुडकून काढा. माझी भूमिका मी याआधीच स्पष्ट केलं. ईडी आणि गुप्तभेटीचा काही संबंध नाही. निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधुंना ईडीची नोटीस आली.एका कंपनीबाबत त्यांना माहिती विचारण्यात आली. चार दिवसांपूर्वीच ते जाऊन आले. ईडीला आवश्यक ती माहिती दिवी. त्याचा आणि भेटीचा संबंध लावण्याची गरज नाही," असं जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीत फूट नाही
राष्ट्रवादीत फूट कुठे पडली असं म्हणत जयंत पाटील म्हणाले की, सगळेच शरद पवार यांचा फोटो लावतात. सगळेच आम्ही शरद पवारांसाठी काम करतोय असं सांगतात, त्यामुळे अजून तरी फूट नजरेत नाही, असंच शरद पवारांनी निवडणूक आयोगाला कळवलं आहे.
जयंत पाटील मंत्रिमंडळात दिसणार का?
जयंत पाटील लवकरच मंत्रिमंडळात दिसू शकतात, अशा चर्चा सुरु आहेत, यावर ते म्हणाले की, "अशा चर्चा कायमच चालू असतात. प्रत्येक आमदार कधीही मंत्री बनू शकतो, अशा आशयाच्या बातम्या लावत अशतात, त्या तुम्ही मनावर घेऊ नका.
पवारांसोबत कायम राहणार?, पाटील म्हणतात...
तुम्ही शरद पवार यांची साथ कधीच सोडणार नाही, यावर जयंत पाटील म्हणाले की, "आहे ना आता बरोबर. तुम्ही हा मुद्दा काढून टाका"
संबंधित बातमी