Maharashtra Politics : 'राज्यात सुरु असलेले सरकार म्हणजे...' खा. विनायक राऊत आणि शहाजीबापूंची एकमेकांविरोधात तुफान फटकेबाजी
Maharashtra Politics : शिवसेना नेते विनायक राऊत यांची सांगोला येथील शिवसेना मेळाव्यात तुफान फटकेबाजी, तर दुसरीकडे शहाजीबापुंनी यावर आव्हान दिले. काय म्हणाले?
Maharashtra Politics : राज्यातील शिंदे फडणवीस सरकार म्हणजे काळू बाळूचा तमाशा असून शहाजीबापू यातील सोंगाड्या आहेत. शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सांगोला (Sangola) येथे शिवसेना मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. तर दुसरीकडे यावर शहाजीबापू पाटील यांनी आव्हान देत मी सोंगाड्या तर विनायक राऊत ठाकरे सरकारमध्ये नाच्या होते का? राऊत याना कोकणात येऊन उत्तर देणार असं म्हटलंय.
तुम्ही काय ठाकरे सरकारमध्ये नाच्या होता का? शहाजीबापूंचा सवाल
सध्या राज्यात सुरु असलेले सरकार म्हणजे काळू बाळूचा तमाशा असून यात एक दाढीवाला तर दुसरा बिन दाढीवाला आहे, तर शहाजीबापू पाटील हा या तमाशातील सोंगाड्या आहे अशी सणसणीत टीका शिवसेनेचे नेते खा विनायक राऊत यांनी केली. शिवसेना आणि ठाकरे यांचेवर तुफानी फटकेबाजी करणारे सांगोल्याचे स्टार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात काल शिवसेनेने सभा घेतली. मात्र ही सभा मोकळ्या मैदानावर न घेता एका बंद सभागृहात पार पडली. या सभेत शहाजीबापू यांनीही खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना आपण जर या सरकार मधील सोंगाड्या आहे, तर तुम्ही काय ठाकरे सरकार मध्ये नाच्या होता का असा सवाल केला. पावसाळा संपला कि मी विनायक राऊत यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असून राऊत यांनी ती ऐकायला आधीच कानातला मळ काढून ठेवावा. या सभेत विनायक राऊत यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असे आव्हान आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले आहे.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या कालच्या जाहीर सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र जाहीर सभेऐवजी एका बंद सभागृहात हा मेळावा पार पडला. अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यात नुकतेच शिवसेनेत आलेले लक्ष्मण हाके, शरद कोळी यांच्यासह माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगाराव , जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी बापूंवर जोरदार तोंडसुख घेतले .
विनायक राऊत यांचा एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना टोला
ABP माझाने दाखविलेल्या जुनोनी येथील शाळेच्या बातमीचा उल्लेख मेळाव्यात विनायक राऊत यांचेसह सर्वच नेत्यांनी करीत आता लहान मुले देखील सांगोल्यात काही ओके नाही असे सांगत असल्याचे टोले शहाजीबापूना मारण्यात आले. मात्र विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ज्या मुख्यमंत्र्याला राष्ट्रगीताला कसे उभारायचे हे कळात नाही, असा मुख्यमंत्री दुर्दैवाने आपल्याला लाभल्याचे सांगितले. अलीबाबा चाळीस चोरांची गोष्ट आपण ऐकली होती, पण यांनी महाराष्ट्रात ती खरी करून दाखविल्याचा टोलाही विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना लगावला.
काय ते सोंग.. काय ते रूप.. ८ वेळा आपटलो..
शहाजीबापू यांचेवर टीका करताना मालवणी भाषेत काय डोंगारचे विडंबन करीत, काय ते सोंग.. काय ते रूप.. ८ वेळा आपटलो, एकदा उद्धवजींनी बाणाचा टेकू दिलो म्हणून वाचलो नाहीतर कायच्या काय गेलो असतो, अशा शब्दात टोलेबाजी केली.