Bhaubeej 2025: रात्री अचानक महापूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं...; पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ, भाऊबीजेलाही बहीण भावाच्या डोळ्यात पाणी
Bhaubeej 2025: सीना नदीकाठी सागर कुंभार, त्याची बहीण आणि आई असे तिघांचे कुटुंब राहत होते. रात्री अचानक महापूर आला आणि होत्याचे नव्हते झाले.

Bhaubeej 2025: “कसली दिवाळी आणि कसलं काय? आता पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ आली,” या एका वाक्यात सविता कुंभार यांचा संपूर्ण वेदनादायक अनुभव दडलेला आहे. दिवाळीच्या (Diwali 2025) उत्साहाने भरलेले दिवस असताना सीना नदीकाठच्या पूरग्रस्तांसाठी (Seena River Flood) मात्र ही दिवाळी दु:खाच्या सावटात गेली.
सीनेच्या महापुराने उध्वस्त झालेल्या सीना दारफळ गावातील कुंभार कुटुंब आजही त्या भीषण घटनेतून सावरू शकलेले नाही. सागर कुंभार, त्याची बहीण सविता आणि आई या तिघांचं छोटं कुटुंब; पण महापुराच्या एका झटक्यात सगळं वाहून गेलं. घर, दुकान, संसार सगळं पाण्याच्या लाटांमध्ये गेले.
Bhaubeej 2025: लोकांच्या मदतीवरच दिवाळी साजरी
दिवाळीच्या सणात जेव्हा सगळीकडे प्रकाशाचा झगमगाट आहे, तेव्हा सविता कुंभार हिने आपल्या भावाला पत्र्याच्या एका छोट्याशा शेडमध्ये ओवाळले. तिच्या डोळ्यांत पाणी होतं आणि ओठांवर एकच प्रश्न “कसली दिवाळी?” सागर कुंभार सांगतो, “पूर आला तेव्हा सगळं वाहून गेलं. आता हे पाच बाय पाचचं पत्र्याचं घर आमचं सगळं काही आहे. शासनाकडून अजून एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. लोकांच्या मदतीवरच दिवाळी साजरी केली,” असे त्याने म्हटले आहे.
Bhaubeej 2025: पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ
तर आईच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळत होते. “घर, दुकान, पैसा सगळं संपलं, पण अजून शासनाची नजरही फिरलेली नाही,” अशी खंत या मातेने व्यक्त केली. सागरच्या आईने आज आपल्या मुलांना पत्र्याच्या शेडमध्येच ओवाळलं. छोट्या थाळीत ठेवलेले दिवे, थोडी फुलं आणि डोळ्यांत ओघळणारे अश्रू. पण भावाबहिणीचं नातं मात्र अजूनही तितकंच तेजाळलेलं आहे. या छोट्याशा शेडमध्ये सागर आणि त्याच्या कुटुंबाचा संसार सुरू आहे. चार पत्र्यांच्या भिंतींमध्ये सुद्धा त्यांनी आशेचा दिवा पेटवला आहे की कधीतरी शासनाचं लक्ष जाईल आणि पुन्हा एकदा खरं घर उभं राहील.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
इतर महत्त्वाच्या बातम्या
























