पूर ओसरुन महिना झाला तरी घरात वीज नाही, शेतकऱ्यांनी जनरेटर भाड्याने आणून घरात कंदील लावले, जनावरांच्या चाऱ्यासाठी पिकं कापलं
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार ही सरकारने केलेली घोषणा अमलात आलेली नाही,हे दुर्दैवी आहे ” ओमराजे पुढे म्हणाले, “सरकारने एक जीआर काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का पाहावं.

Solapur: सीना नदीला आलेला पूर ओसरून महिना उलटला असला तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे-पाथरीसह परिसरातील पूरग्रस्त भागांमध्ये अजूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार आहे. दिवाळीसारखा सण साजरा करण्यासाठीही त्यांना जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे. पूरानंतर सरकारकडून तातडीची मदत म्हणून जाहीर करण्यात आलेले दहा हजार रुपये मिळाले, पण या रकमेने फक्त जनरेटरचे भाडे आणि डिझेलचा खर्च भागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण आनंदात साजरा करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. (Solapur Flood Update)
पूर ओसरला, पण अंधार कायम!
"तिऱ्हे-पाथरी गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, “आमच्या घरात अजूनही वीज आलेली नाही. जनरेटर लावूनच आकाशकंदील लावावा लागतो. सरकारची मदत अजून मिळालेली नाही. फक्त घोषणा होत आहेत, पण प्रत्यक्षात काहीच हातात येत नाही.” काही शेतकऱ्यांनी दिवाळी किटमध्ये मिळालेल्या वस्तूंचा वापर करून दिवाळी साजरी केली असली, तरी जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना ऊस कापून जनावरांना खाऊ घालावा लागत असल्याचेही दिसून आले.
खात्यात पैसे जमा पण...
दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले, “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी घोषणा सरकारने केली होती, पण आजही अनेक गावांमध्ये ती मदत पोहोचलेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असले तरी बँकांच्या आडमुठेपणामुळे ती रक्कम होल्ड करण्यात आली आहे.दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार ही सरकारने केलेली घोषणा अमलात आलेली नाही,हे दुर्दैवी आहे ” ओमराजे पुढे म्हणाले, “सरकारने एक जीआर काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का पाहावं. कारण ज्या प्रकारे सरकार सांगत होतं दिवाळीच्या पूर्वी मदत करू. आज खाली गावागावात जाऊन बघा काय अवस्थाय.


















