Satara : शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Satara Latest News : गणरायासाठी फुले तोडायला गेल्यावर लागलेल्या विजेच्या शॉकमुळे एकाच कुटंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.
Satara Latest News : गणरायासाठी फुले तोडायला गेल्यावर लागलेल्या विजेच्या शॉकमुळे एकाच कुटंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील तासवडे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
हिंदुराव शिंदे आणि सदाशिव शिंदे असे हे दोघे भावांचे कुटुंब...एकाच छताखाली राहणाऱ्या या दोन भावांच्या कुटुंबावर मोठा अघात घडला. आणि यांच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील शुभम हा सध्या नोकरी निमित्ताने पुण्याला असतो. गणेश उत्सवात त्याने सुट्टी टाकली आणि गणरायाच्या स्थापने आगोदर तो त्याच्या गावी आला. शुभमने गणरायाच्या स्वागताची आरास करुन मोठी तयारी केली. भक्ती भावाने गणरायाची स्थापना केली. तीन दिवसापासून गणरायाची मनोभावे पुजाअर्चा सुरू होती. शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर सायंकाळचे सहा ही वेळ या शुभमचा शेवटचा दिवस ठरला. काही वेळात गणरायाची आरती होणार होती. तशी लगबग सुरू होती. तेवढ्यात शुभमच्या चुलतीने मोठ्याने हाक मारली शुभम काकाला काय झालं बघ. शुभम हातातील आरतीचं ताट ठेऊन बाहेर आला. नजरेच्या टप्प्यात असलेल्या विहिरीच्या काठावर त्याने नजर मारली. चुलते हिंदूराव हे निपचीप पडलेले होते. हा धावत विहिरीकडे निघाला आणि त्याच वेगाने शुभमची आई सीमा ही त्याच्या पाठोपाठ गेली. शुभम ने काकाला उचलायला मानेत हात घातला आणि शुभम ही जागेवर कोसळला. मुलगा ही कोसळलेला पाहिल्यानंतर आई सीमा यांनी मुलाला पकडायचा प्रयत्न केला. आणि त्याची आई ही जागेवर निस्तब्ध झाली. पाठोपाठ वाचवायला आलेल्या दोघांना तिथून फेकून दिलं. तेव्हा इतर लोक जमा झाली त्याच्या हा सर्व प्रकार लक्षात आला...शॉक लागल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे समजल्यानंतर विद्युत महामंडळात फोन करण्यात आला आणि लाईट बंद केल्यानंतर सर्वांना दवाखान्यात दाखल करण्यात आले... माञ वेळ निघून गेली होती शुभम, शुभमची आई, आणि त्याचे चुलते तिघांचा या घटनेत मृत्यू झाला होता.
गणरायाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत गणरायाला आवडणाऱ्या या फुलांचा हार चढवला जातो आणि हीच फुलं आणण्यासाठी विहिरीच्या काठावर गेलेले हिंदूराव शिंदे हे पहिले बळी ठरले. या घटनेने माञ गावावर शोककळा पसरली आहे. नेहमी फुलं वेचणाऱ्या या कुटुंबाला आज पर्यंत कधी शॉक लागला नव्हता. पण अचानक अस कसं घडलं याचा शोध घेण्यासाठी विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
अधिकारी काहीही सांगत असले तरी या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी कुटुंब आणि ग्रामस्थ करतायत. हळहळ करायला लावणाऱ्या घटनेची माहिती समजताच सातारचे खासदार श्रीनिवास पाटील घटनास्थळी पोहोचले आणि शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले.