Satara News : अडीच कोटीत दारु विक्री परवाना देण्याचा बहाणा, एक कोटी 5 लाख घेतले, पुणे सीआयडी अपर पोलीस अधीक्षकाला अटक
Satara News :महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसायिकाला दारु विक्रीचा परवाना देण्याच्या बहाण्यानं एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीआयडीच्या अपर पोलीस अधीक्षकाला अटक करण्यात आली आहे.
सातारा : पुणे सीआयडीचा अपर पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे याला एक कोटी पाच लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.दारू परवाना मिळवून देण्याचा बहाना करून फसवणूक केल्या प्रकरणी त्याना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी श्रीकांत कोल्हापुरेला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली होती.
महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिक हनमंत साळवी यांना दारु विक्रीचा परवाना देतो असे सांगून सुमारे एक कोटी पाच लाखाला फसवल्याचे उघडकीस आले आहे. या बाबत साळवी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सीआयडी विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना साताऱ्यातील वाई न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
अडीच कोटींमध्ये परवाना देण्याचा बहाणा
श्रीकांत कोल्हापुरे याने दारु विक्रीचा परवाना अडीच कोटी रुपयांमध्ये देण्याचे कबुल केले होते. टप्प्या टप्याने साळवी यांनी कोल्हापुरे यंना एक कोटी पाच लाख रोख आणि धनादेशाद्वारे दिले होते. यात मध्यस्थी असलेले सुमारे कोल्हापुरेसह नऊ जण होते. दारु परवाना मिळणार नाही, यात आपली फसवणूक झाली आहे असे समजल्यानंतर साळवी यांनी याबाबतची तक्रार अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी तपास करुन श्रीकांत कोल्हापुरे याच्यासह नऊ जणांवर जुलैमध्ये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात कोल्हापुरे याचा प्रत्यक्ष संबध आल्याचे तपासात समोर आले होते. यातील यापुर्वी हनुमंत मुंडे, अभिमन्यु देडगे आणि बाळू पुरी या तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी कोल्हापुरे हा पळून गेला होता. नाशिक- मुंबई रोडवरील ठाण्यातील खटवली टोलनाक्यावर याला पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले होते.
श्रीकांत कोल्हापुरे हा मुळचा कोल्हापुर जिल्ह्यातील असून सध्या तो पुणे येथे राहत आहे. याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरु केली असून. त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का या बाबतचाही तपास केला जात आहे.
इतर बातम्या :