Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Maharashtra Assembly Election 2024 : विलास भुमरे हे अचानक चक्कर येऊन पडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे त्यांच्या हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार केला जात आहे. आता प्रचारासाठी केवळ दिवस उरले असून पैठण विधानसभा मतदारसंघातून (Paithan Vidhan Sabha Constituency) महायुतीसाठी वाईट बातमी समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचाराला जोर आल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवारांकडून सुरु आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) पैठण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विलास भुमरे (Vilas Bhumre) हे चक्कर येऊन कोसळले आहेत.
हाता-पायाला चार ठिकाणी फ्रॅक्चर
विलास भुमरे आज पहाटे फोनवर बोलत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला चार ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आज ऑपरेशन केलं जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात वेळेवर जेवण आणि झोप होत नसल्याने त्यांना चक्कर आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांना आता प्रचार करता येणार नाही. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे, मात्र त्यांना पुढील प्रचार करता येणार नाही, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.
विलास भुमरे यांना प्रचार थांबवण्याची वेळ
दरम्यान, खासदार संदिपान भुमरे यांचे विलास भुमरे पुत्र आहेत. विलास भुमरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेत बांधकाम सभापतीपद सांभाळले आहे. संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आल्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास भुमरे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विलास भुमरे यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उमेदवार दत्ता गोर्डे यांच्याशी होणार आहे. विलास भूमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी पैठण मतदारसंघात जोरदार प्रचार केलाय. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी त्यांना दुखापत झाल्याने विलास भुमरे यांना प्रचार थांबवावा लागत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या