Sanjay Raut : काल औरंगजेबाशी तुलना, आज थेट पाकिस्तान निर्माते जिन्नाशी संबंध जोडला, संजय राऊत मोदी-शाहांबद्दल काय काय म्हणाले?
Sanjay Raut : संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काल औरंगजेबाशी मोदींची तुलना केली होती तर आज थेट पाकिस्तान निर्माते जिन्नाशी संजय राऊतांनी संबंध जोडला आहे.
Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) तुलना औरंगजेबाशी केली होती. आज ज्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्मला, त्याच गुजरातमध्ये मोहम्मद अली जिन्ना जन्मला, असा हल्लाबोल संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केला आहे. मिरज येथील जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रावर 400 वर्षांपूर्वी औरंगजेब नावाचे संकट आले. आज जे संकट आपण भोगतोय, तसेच संकट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता. तेव्हादेखील औरंगजेबाशी संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र वाचवला.
औरंगजेबाच्या बाजूच्या गावात नरेंद्र मोदींचा जन्म
आज मी तुलना करतो की, महाराष्ट्रावर आज दिल्लीच्या आणि गुजरातच्या सुलतानांचा हल्ला का सुरु आहे? खोलात शिरलो तेव्हा माझ्या लक्षात आले की, औरंगजेबी वृत्ती गुजरातच्या भूमीतून दिल्लीत गेली आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून आली ती यासाठी की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्रात धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म झाला. पण त्याच वेळी बाजूच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला. गुजरातच्या दाहोद गावात औरंगजेबाचा जन्म झाला आणि त्याच्या बाजूच्या गावात नरेंद्र मोदींचा जन्म झाला.
गुजरातमध्येच मोहम्मद अली जिनाच जन्म
त्यामुळे तुम्हाला कळाले असेल की, महाराष्ट्रावर दिल्लीचे आक्रमण का होत आहे. जे औरंगजेबाने केले तेच आज गुजरातचे दोन राज्यकर्ते दिल्लीत बसून करत आहेत. ज्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला त्याच गुजरातमध्ये मोहम्मद अली जिना जन्माला आले. ज्यांनी पाकिस्तान निर्माण केले. प्रत्येक भूमीचे एक वैशिष्ट्य असते. येथे शिवाजी महाराज जन्माला आले. संभाजी महाराज जन्माला आले. येथे देश अखंड ठेवणाऱ्या अखंड शक्ती जन्माला आल्या. येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्माला आले. आणि बाजूच्या राज्यात मोहम्मद अली जिना ज्यांनी पाकिस्तान निर्माण केला तो जन्माला आला, औरंगजेब जन्माला आला.
सगळ्या सरदारांनी माझे गुलाम व्हावे आणि मी बादशाह
औरंगजेबाने काय केले? औरंगजेब खूप धार्मिक माणूस होता. तो फावल्या वेळात टोप्या विणायचा. आणि जपमाळ ओढत बसायचा आणि मी धार्मिक माणूस आहे असे ढोंग निर्माण करायचा. औरंगजेबाने देशात असा फतवा केला की, सगळ्या सरदारांनी माझे गुलाम व्हावे आणि मी बादशाह, आज या देशात अशीच परिस्थिती आहे. औरंगजेबाने आपल्या भावाला, आपल्या वडिलांनाही सोडले नाही, आज आपल्या देशात तीच परिस्थिती आहे.
महाराष्टात कुणी चाल करून येणार असाल तर याद राखा
औरंगजेब सगळ्यांशी गोड बोलायचा आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसायचा आणि राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा. औरंगजेबाने फोडा झोडा आणि राज्य करा. हीच नीती अवलंबली. गुजरातमधून दिल्लीत गेलेल्यांनी देखील हीच नीती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाबतीत अवलंबली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. औरंगजेबाला शेवटी महाराष्ट्राच्या याच भूमीत गाडण्यात आले. त्याची कबर महाराष्ट्रात खणली. महाराष्टात कुणी चाल करून येणार असाल तर याद राखा, असे सांगण्यासाठी ही आजची सभा आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
आणखी वाचा