Sangli News : सांगलीत रात्री उशिरापर्यंत राम भक्तांकडून जल्लोषात रामनवमी, मध्यरात्री मुस्लिम कार्यकर्त्यांकडून रमजान तराबीनंतर त्याच चौकात साफसफाई!
Sangli News : रामनवमी साजरी होत असताना राम भक्तांकडून झालेल्या कचऱ्याची साफसफाई मुस्लीम कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे रामनवमीच्या निमित्ताने सांगलीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून आले.
Sangli News : सांगलीमध्ये गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राम भक्तांकडून जल्लोषात रामनवमी साजरी करण्यात आली. यानंतर मध्यरात्री मुस्लिम कार्यकर्त्यांकडून रामनवमी साजरी होत असताना राम भक्तांकडून झालेल्या कचऱ्याची साफसफाई मुस्लीम कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे रामनवमीच्या निमित्ताने सांगलीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून आले. सांगलीच्या राम मंदिर चौकात गुरुवारी रात्री साथीदार युथ फौंडेशनच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
अगदी उशिरापर्यंत रामनवमीचा जल्लोष रंगला. मध्यरात्रीस गर्दी संपली, आणि मागे रस्त्यावर ढिगभर कचरा झाला होता. तो पाहून रमजानच्या तराबीनंतर घरी परतणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे हात सफाईसाठी सरसावले. पहाटे दोनपर्यंत अवघा चौक टकाटक करुन सोडला. गुरुवारी दिवसभर साथीदार फौंडेशन आणि राम मंदिर चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे भक्तीपूर्ण वातावरणात रामजन्मोत्सव साजरा झाला.
हजारो भाविकांनी रांगा लावून श्रीरामाचे दर्शन घेतले. सायंकाळी मुख्य कार्यक्रम उशिरापर्यंत रंगला. मध्यरात्री संपला, तेव्हा चौकात सर्वत्र कचरा पसरला होता. भाविकांनी व कार्यकर्त्यांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कागदाचे रंगीबेरंगी कपटे, उधळलेली फुले अशा कचऱ्यामुळे रस्ता माखून गेला होता. महापालिकेचे सफाई पहाटे साफसफाई करणार होते, पण तत्पूर्वीच त्या रोडवरून जाणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांना चौकातील कचरा दिसला.
रामभक्तांनी मुस्लिम कार्यकर्त्यांचे मानले आभार
यावेळी इन्साफ फौंडेशनच्या मुस्तफा मुजावर यांच्यासह अन्य काही जणांनी काही वेळात त्या ठिकाणी स्वच्छता सुरु केली. मदतीला सावली बेघर केंद्रातील रहिवासी आणि इन्साफ फौडेशनच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेतले. मध्यरात्री बारापासून पहाटे सफाईनंतर चौकात कचऱ्याचा एकही कपटाही उरला नाही. गोळा केलेला कचरा सकाळी महापालिकेच्या गाडीतून डेपोवर गेला. रामनवमीच्या जल्लोषानंतर झालेला कचरा मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकत्र येत गोळा केल्याने साथीदार ग्रुपच्या सदस्यांनी आणि रामभक्तांनी देखील या मुस्लिम कार्यकर्त्यांचे आभार मानले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन गटात तणाव
दुसरीकडे, रावनवमीच्या उत्साहाला गालबोट लागणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री शहरात दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तर या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी मोठं पाऊल उचललं असून, शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी 'एसआयटी'ची स्थापना केली आहे. किराडपुरा भागात झालेल्या या राड्याची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे या पथकाचे प्रमुख असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या