Sangli News: पार्टीनंतर पोहायला गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
तिम्बती आवळे सहकारी विनायक कांबळे यांच्या घरी जेवणाच्या पार्टीसाठी गेले. पार्टीनंतर दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु, पोहत असताना तिम्बती आवळे हे शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
Sangli Crime: सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यात दम लागल्याने ते बुडाले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर सांगली पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाण्यात दम लागल्याने बुडाल्याची शक्यता
मंगळवारी भोसे येथे सांगली होमगार्ड चालकांची परीक्षा होती. या परीक्षेसाठी तिम्बती आवळे आणि त्यांच्या सहकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. होमगार्ड चालकांची परीक्षा झाल्यानंतर तिम्बती आवळे हे सहकारी विनायक कांबळे यांच्या घरी जेवणाच्या पार्टीसाठी गेले होते. पार्टीनंतर दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु, पोहत असताना तिम्बती आवळे हे शेततळ्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाण्यात दम लागल्याने ते बुडाले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
वारणा नदीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
दरम्यान, 27 मे रोजी सांगलीमध्येच पोहता येत नसतानाही रणरणत्या उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी वारणा नदीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे ही घटना उघडकीस आली. अमोल प्रकाश सुतार (वय 16) आणि रविराज उत्तम सुतार (वय 12) ही नात्याने मावस भाऊ असलेली दोन शाळकरी मुलं वैरण काढण्यासाठी वारणाकाठी असलेल्या शेतात गेली होती. रविराज सुतार हा मूळचा राजमाची (ता. कराड) येथील रहिवासी असून उन्हाळी सुट्टीसाठी तो मावशीकडे तांदुळवाडीला आला होता. वाढत्या उन्हाच्या काहिलीने थंडाव्यासाठी दोन्ही मुले वारणा नदीपात्रात उतरली होती. दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने या मुलांचा बुडून मृत्यू झाला.
मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू
दुसरीकडे, मामाच्या गावी उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या अवघ्या 13 वर्षीय आदित्य शिवाजी पाटील या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वेतवडीमध्ये घडली होती. आदित्य वेतवडेमध्ये मामाकडे उन्हाळी सुट्टीसाठी महिनाभर राहण्यासाठी आला होता. दुपारच्या सुमारास वेतवडे येथील धामणी नदीत आंघोळीसाठी गेला होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तसेच पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने सर्वत्र त्याची शोधाशोध सुरु करण्यात आली. जनावरांना पाण्यासाठी घेऊन गेलेल्या एका व्यक्तीला नदीकाठी चप्पल आणि कपडे दिसल्याने तो या ठिकाणीच बुडाला असणार याचा अंदाज घेऊन गावातील तरुणांनी पाण्यात शोध सुरु केला. अखेर सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.
इतर महत्वाच्या बातम्या