सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
स्फोट इतका भीषण होता की यामध्ये संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या घटनीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु यामध्ये चौघांना होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले.

Sangli Fire: सांगलीच्या विट्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणार्या दुकानात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्यामध्ये चौघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. यामध्ये 2 पुरूष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. या घटनेत मयत झालेल्यांचे विट्यात जुना वासुंबे रस्त्यावर स्टिल व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. खाली दुकान असून मयत हे पहिल्या मजल्यावर राहण्यास होते. दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या फ्रिजमधील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की यामध्ये संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या घटनीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु यामध्ये चौघांना होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या भीषण आगीत दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (वय 47), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (वय 42), मुलगी प्रियांका योगेश इंगळे (वय 25) आणि नात सृष्टी योगेश इंगळे ( वय 2) या चौघांचा होरपळून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. भीषण आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले होते. विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला. सतर्क नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला
विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या तीन मजली इमारतीत जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे. पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे. तर उर्वरित इमारतीत जोशी यांचे कुटुंब राहते. दरम्यान आज सकाळी दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला. आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहाजण अडकले होते.
आजुबाजूला घरे एकमेकांना चिटकून असल्याने ही आग विझवण्यासाठी आणि मदत कार्यात अडथळे येत होते. दहा वाजण्याच्या सुमारास कडेगांव नगरपंचायतचा अग्निशमन बंब, कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब, उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब, पलुस नगरपालिकेचा अग्निशमन बंब, तासगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण सहा अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचे प्रयत्न केला.
इतर महत्वाच्या बातम्या
























