Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत दोन बैलजोड्यांनी फॉर्च्यूनर कार जिंकण्याचा पराक्रम केला. लखन आणि सर्जा या बैलजोडीने मालकाचे पांग फेडले.

Sangli Bailgada Race Sharyat: चंद्रहार पाटील यांनी सांगलीत आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. या शर्यतीसाठी दोन फॉर्च्युनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी अशी आकर्षक बक्षीसं ठेवण्यात आली होती. त्यामुळे या शर्यतीसाठी (Bailgada Sharyat) राज्यभरातून बैलगाडा मालक आपापले बैल घेऊन सांगलीत दाखल झाले होते. अखेर रविवारी रात्री रंगलेल्या या स्पर्धेत दोन बैलजोड्यांनी फॉर्च्युनर कार जिंकण्याचा मान मिळवला. हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत एक फॉर्च्यूनर गाडी जिंकली तर दुसरी फॉर्च्यूनर गाडी लखन आणि सर्जा या बैलजोडीने जिंकली. यापैकी सर्जा हा बैल एका सामान्य शेतकऱ्याचा होता. (Sangli News)
सर्जा बैलाचा मालक असलेला शेतकरी हा हिंगोली जिल्ह्यातील दांडेगावचा आहे. तब्बल 500 किलोमीटरचा प्रवास करत तो आपल्या बैलाला घेऊन शर्यतीसाठी आला होता. या शर्यतीत सर्जाने मैदान मारत फॉर्च्यूनर जिंकल्यानंतर मालकाला प्रचंड झाला. त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सकाळपासून आमच्या बैलापाशी कोणी आलं नाही. गरिबाच्या दावणीचा बैल असल्याने त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. सगळे कॅमेरे हे मोठ्या नावाजलेल्या बैलांपाशी घुटमळत होते. मात्र, या शर्यतीत माझ्या बैलाने मैदान मारले. आता बक्षीस घ्यायला आम्हाला मंत्रालयात जायला मिळणार आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे, असे सर्जा बैलाच्या मालकाने सांगितले. आज आमच्या मनासारखं झालं. सकाळपासून बकासूर, मेहबूब, मथुर या बैलांची जोरदार चर्चा होती. मात्र, सर्जा आणि लखनने मैदान मारले. आता सर्जा हा काळ्या रंगाचा असल्याने त्याला ब्लॅक फॉर्च्युनर कारच द्यावी, अशी विनंती चंद्रहार पाटलांना करणार असल्याचे एका बैलगाडा शर्यतप्रेमीने सांगितले. (Bullock cart race in Sangli)
सांगलीच्या तासगाव- बोरगाव जवळील कोड्याचा मळा येथील 500 एकर मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या बैलगाडा शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट आणि 150 दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या. या बैलगाडा शर्यतीसाठी राज्यभरातून लाखो बैलगाडा शर्यतप्रेमींनी गर्दी केली होती. हे शर्यतीचे मैदान संपल्यानंतर लगेचच चंद्रहार पाटील यांनी पुढच्या शर्यतीची घोषणा करत त्या स्पर्धेत बीएमडब्ल्यू बक्षीसाची घोषणा केली.
आणखी वाचा























