(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti on Rahul Gandhi : तुम्हीही विरोधी पक्षात जाल, मग तुमची अवस्था काय होईल? याचा विचार करा; राजू शेट्टींचा मोदी सरकारला इशारा
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून न्यायालयाने ज्या तत्परतेने शिक्षा दिली ते सुद्धा संशयास्पद वाटते. न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्यासारखं सामान्य माणसाला वाटत आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.
Raju Shetti on Rahul Gandhi : केवळ सत्तेत आहेत म्हणून यंत्रणेचा ते गैरवापर करू शकतील, पण त्यांनाही भविष्यात विरोधी पक्षात जावं लागेल, त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल याचा विचार करावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मोदी सरकारला दिला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर करण्यात आलेल्या खासदारकी रद्दच्या कारवाईवरून त्यांनी सांगलीमध्ये प्रतिक्रिया दिली.
राजू शेट्टी म्हणाले की, आजकाल राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनात भाषेचा कशा पद्धतीने वापर करावा किंवा खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करावी याचं कोणतेही ताळतंत्र राहिलेलं नाही. संसदीय आणि असंसदीय शब्द सर्रास वापरले जातात. हे खरं असलं तरी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून न्यायालयाने ज्या तत्परतेने शिक्षा दिली ते सुद्धा संशयास्पद वाटते. न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्यासारखं सामान्य माणसाला वाटत आहे.
जे आज दगड मारत आहेत ते काचेच्या घरात राहत आहेत
खालच्या पातळीवर जाऊन जातीय तेढ निर्माण होईल, वांशिक द्वेष निर्माण होईल, हिंसेला प्रेरणा देईल किंवा एखाद्याची मानहानी होईल, अशा प्रकारची वक्तव्ये त्यांच्याकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे या सर्वांकडे दुर्लक्ष करून या प्रकारे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द करणे चुकीचे आहे असं माझे स्पष्ट मत आहे. राजकारण बाजूला ठेवा. लोकशाहीवर प्रेम करणारा माणूस म्हणून मला वाईट वाटत आहे. हे चुकीचं आहे. जे आज दगड मारत आहेत ते काचेच्या घरात राहत आहेत. त्यांच्याकडे दगड उगारला तर काचा फुटून जातील. सत्तेत आहेत म्हणून यंत्रणेचा वापर करू शकतील, पण भविष्यात कधी तरी त्यांना विरोधी पक्षात बसावं लागेल त्यावेळी काय होईल याचा त्यांनी विचार करावा.
यांची वक्तव्ये पाहता राहुल यांचे वक्तव्य मिळमिळीत
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या वक्तव्यावरून जातीवाचक बोलले आहेत असही वाटत नाही. कोणाची बदनामी करावी, असही वाटत नाही. एकाच आडनावाचे लोक घोटाळेबाज कसे काय असू शकतात? असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण जे त्यांच्यावर कारवाई केल्याचा आनंद मानताहेत त्यांनी केलेली वक्तव्ये पाहता सार्वजनिक व्यासपीठावरील भाषा तपासून पाहता राहुल गांधी यांचे वक्तव्य मिळमिळीत वाटते असं म्हणावं लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या