Sangli News : सांगलीतील सशस्त्र रिलायन्स ज्वेल्स दरोड्यात आणखी नऊ संशयितांची नावं निष्पन्न; विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारींची माहिती
आरोपींच्या शोधासाठी तपास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.
सांगली : सांगली शहरातील (Sangli News) मार्केट यार्ड परिसरात रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवरील दरोडाप्रकरणी अन्य नऊ संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये पोलिसांकडून या दरोड्यातील आरोपी अंकुरप्रताप रामकुमार सिंहची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत या सर्वांची माहिती मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या शोधासाठी तपास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.
अंकुरप्रताप सांगलीतील दरोड्यात वाहनचालकाच्या भूमिकेत होता. तो इलेक्ट्रिशयन असल्याने दुकानातील सीसीटीव्ही कनेक्शन तोडून डीव्हीआर घेतला होता. रिलायन्स ज्वेल्स दुकानावर दरोडा नियोजनबद्ध होता. दरोडेखोरांनी पोलिस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून कोट्यवधींचे दागिने लंपास केले. चोरटे चारचाकीतून तसेच दोन दुचाकीतून पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी बिहार, ओडिशा येथे पथके पाठवण्यात आली होती.
त्यानंतर गणेश उद्धव बद्रेवार (हैदराबाद), प्रताप अशोकसिंग राणा (बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (पश्चिम बंगाल) आहे. आणि प्रिन्स कुमार सिंग (बिहार) या चार मुख्य संशयितांची नावे जाहीर करण्यात आली. ओडिशा येथे अशाच पद्धतीने पुन्हा रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यात आला, तेथे तो डाव फसल्याने तिघे पोलिसांना सापडले. त्यात अंकुरप्रताप सहभागी होता.
सशस्त्र दरोड्याचा कट कोल्हापूर आणि नांदेडात शिजला
अंकुरला ताब्यात घेतल्यानंतर बऱ्याच घटनांचा उलगडा होत आहे. ज्वेल्सवरील सशस्त्र दरोड्याची तयारी त्यांनी कोल्हापूर आणि नांदेडमधून केली होती. या सशस्त्र दरोड्याची उकल करण्यासाठी सांगली पोलिसांनी परराज्यात 50 दिवसांपेक्षा जास्त काळ राहून आरोपीचे धागेदोरे शोधून काढले आहेत. अंकुर सध्या पोलिस कोठडीत आहे. सशस्त्र दरोड्याची उकल करण्यासाठी सांगली पोलिसांनी परराज्यात 50 दिवसांपेक्षा जास्त काळ राहून आरोपीचे धागेदोरे शोधून काढले आहेत.
4 जून रोजी भर दुपारी सात ते आठ जणांच्या टोळीने मार्केट यार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावर सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी पोलिस असल्याची बतावणी करत पिस्तूलाच्या धाकाने दुकानातील तब्बल साडे सहा कोटींचे दागिने, महागडे हिरे, रोकड लंपास केले होते. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करून टाटा सफारी (क्र. एमएच 04 ईटी 8894) या गाडीतून तसेच दोन दुचाकीवरुन पसार झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या