(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha kranti Morcha in Sangli : सांगलीत आज मराठा वादळ घोंगावणार, मराठा क्रांती मोर्चाकडून 2.0 विराट मोर्चा; पार्किंग, कोणत्या मार्गावरून मोर्चा जाणार?
जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या मोर्चात लाखो बांधव सहभागी होतील, असा दावा संयोजकांनी केला आहे.
सांगली : सांगलीत (Sangli News) आज मराठा क्रांती मोर्चा 2.0 धडकणार आहे. मराठा आरक्षण तसेच जालन्यातील आंतरवाली सराटीत झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ हा मोर्चा धडकणार आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी गेल्या 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. काल एक दिवस अगोदर मोर्चासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या मोर्चात लाखो बांधव सहभागी होतील, असा दावा संयोजकांनी केला आहे.
जिल्हाभरातून येणाऱ्यांसाठी सुलभ पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा मार्गाची पाहणी करून आढावा घेतला आहे. विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते राम मंदिर चौक या परिसरात सर्वत्र ध्वनीक्षेपकांसह इतर सुविधा करण्यात आल्या आहेत. मोर्चात कोणत्याही जातीधर्माविरोधात घोषणा देऊ नयेत, कोणी देणारही नाहीत याकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
'या' ठिकाणी पार्किंगची सोय
- इस्लामपूर, शिराळा, वाळवा, आष्टाकडून येणाऱ्यांसाठी जुना बुधगाव रस्त्यावरील इदगाह मैदान, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण याठिकाणी सोय असेल.
- तासगाव, पलूस, आटपाडी, विटा येथून येणाऱ्यांसाठी तात्यासाहेब मळा, लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क, मार्केट यार्ड परिसरात सोय असेल.
- जत, कवठेमहांकाळ, मिरजकडून येणाऱ्या आंदोलकांसाठी आयटी पार्क, कांतीलाल शहा प्रशाला, चिंतामणी कॉलेज मैदान, वालचंद महाविद्यालय, भोकरे कॉलेज या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
- जयसिंगपूर, कोल्हापूरकडून येणाऱ्यांसाठी राजमती शाळा मैदान, कल्पद्रूम मैदान, शंभर फुटी रस्ता परिसरात पार्किंग असेल.
मोर्चा या मार्गावरून जाणार
विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून सकाळी साडे दहा वाजता मोर्चाला जिजाऊ वंदना करून सुरूवात होईल. या वेळी क्रांतीसिंहांच्या पुतळ्याला स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्याहस्ते पुष्पहार अपर्ण करण्यात येईल. यानंतर मोर्चा गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, कर्मवीर चौक मार्गे राममंदिर चौकात पोहोचणार आहे. या ठिकाणी केवळ चार भाषणे होणार आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.
अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार नाही
मोर्चा सुरू असला तरी अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार नाही. मोर्चा कालावधीत सेवा रस्त्यांवरून रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण मोर्चा मार्गावर आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक सेवाभावी संघटनांकडून अल्पोपहाराचीही सोय करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :