Karnataka Elections 2023: कोल्हापूर परिक्षेत्रात 4.41 कोटींचा मुद्देमाल जप्त; 2,890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत.
Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात 4.41 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 88 लाखांची रोकड, 35 हजार लिटर दारू, सव्वा दोन लाखांचा गांजा, 3.25 कोटींचे रसायन, 5 लाखांची 11 पिस्तूल, गावठी कट्टे यांचा समावेश आहे. तब्बल 2 हजार 890 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी पोलिसांचे तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. सीमावर्ती भागातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सीमावर्ती भागातील महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग तसेच अन्य मार्गांवर पोलिसांनी कडक वॉच ठेवला आहे. सीमावर्ती भागात तपासणी नाके उभे केले आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी सीमावर्ती भागात गेल्या 15 दिवसात मोठी कारवाई केली आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रात 7 केसेस करून 11 पिस्तुल, गावठी कट्टे, 4 कोयते असा 5.16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीआरपीसी 107 प्रमाणे 1 हजार 875 जणांवर, 108 प्रमाणे 7 जणांवर, 109 प्रमाणे 18, 110 प्रमाणे 86, 149 प्रमाणे 728, 144 प्रमाणे 89 असे तब्बल 2 हजार 890 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचेही महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
सोलापूर ग्रामीण हद्दीतही मोठी कारवाई
दरम्यान, सोलापूर ग्रामीणच्या हद्दीत 88 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 20.30 लाख रुपयांची 35 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. गुटख्याची 2.33 लाख पाकिटे जप्त करून एक टेंपो, एक ट्रक, कार, 3 मोबाईल जप्त केले आहेत. 3.25 कोटी रुपयांचा दारुसाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे, कर्नाटकातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. 10 तारखेला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करत असले तरी कर्नाटकात सत्ता कुणाची येणार हे अवघ्या पाच दिवसात स्पष्ट होणार आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याने काँग्रेस, भाजप आणि जनता दल या तिन्ही पक्षांनी त्यांची ताकद लावली आहे. तीन प्री-पोल सर्वेक्षणांमध्ये (Karnataka Elections 2023 C Voter Survey) काँग्रेस मोठ्या बहुमताने कर्नाटकात सत्तेत येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. झी न्यूज-मॅट्रिझने आपल्या जनमत सर्वेक्षणात भाजपला पुन्हा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या