Christian Samaj Shanti Maha Muk Morcha : पुरोगामी महाराष्ट्रात ख्रिस्ती बांधव असुरक्षित; सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाकडून शांती महा मूक मोर्चा
Christian Samaj Shanti Maha Muk Morcha : सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाकडून शांती महा मूक मोर्चा काढण्यात आला. समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले.
Christian Samaj Shanti Maha Muk Morcha : सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाकडून शांती महा मूक मोर्चा काढण्यात आला. समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले. संविधानामध्ये समान हक्क दिले असताना महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती बांधव स्वतःला असुरक्षित मानत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ख्रिस्ती समाजाला जाणूनबुजून टार्गेट केले जात असल्याचे म्हटले आहे.
आटपाडीत वरद हाॅस्पिटलमध्ये धर्मांतराचे प्रकरण समोर आल्यानंतर सांगली जिल्ह्यात वाद चांगलाच पेटला आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चे काढण्यात आल्यानंतर आज ख्रिस्ती समाजाकडूनही मोर्चा काढण्यात आला. आतापर्यंत सर्वजण सलोख्याने राहत असताना काही जातीय आणि धर्मांध लोकांनी त्याला काळिमा फासण्याचे काम केल्याचा आरोप समाजाने केला. काही लोक जाणीवपूर्वक ख्रिस्ती धर्म हा इंग्रजांपासून आला आहे अशी खोटी आणि चुकीची अफवा पसरवत असून ही गोष्ट अतिशय निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाजाला जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. छत्रपती शाहू महाराजांनी ज्या ख्रिस्ती बांधवांना सर्वोतोपरी मदत केली, त्यांच्याच धार्मिक भावना काही धर्मांध लोक दुखवत आहेत. ख्रिस्ती समाजाच्या पवित्र विधीची बदनामी केली जात आहे आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरुंवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. आजपर्यंत आम्ही शांतीच्या मार्गानेच जात आहोत, परंतु आता ख्रिस्ती बांधवांना विरोध फार मोठ्या प्रमाणावर होत आहे.
ख्रिस्ती समाजाची मोर्चातून कोणती मागणी?
- ख्रिस्ती समाजावर, चर्चवर, पाळक लोकांवर हल्ले, अन्याय आणि अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावे.
- ज्या ज्या धर्मगुरुंवर आणि समाजातील लोकांवर धर्मांतराच्या नांवावर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत, त्या तात्काळ मागे घेण्यात यावे.
- ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळ आणि मेळावे असतील तिथे पोलीस संरक्षण देण्यात यावे.
- ज्या चर्चवर हल्ला करुन नासधूस झाली आहे, त्यांना सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देऊन, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी.
- काही समाजकंटक जाणीवपूर्वक पवित्र प्रभू भोजन विधीचा अपमान करत आहेत, तरी अशा सर्व समाजविघातक घटकांवर कडक कारवाई करण्यात यावी.
- बेकायदेशीररित्या चर्चमध्ये प्रवेश करुन प्रार्थना थांबवायचे अधिकार या समाजकंटकांना कोणी दिले? याची चौकशी व्हावी आणि सर्व ख्रिस्ती धर्मगुरुंना संरक्षण मिळावे.
इतर महत्वाच्या बातम्या