(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli District Central Co-Operative Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आणखी एक कारनामा; 40 कोटींच्या सूतगिरणीचा अवघ्या 14 कोटींमध्ये व्यवहार
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची एकीकडे सध्या चौकशी सुरु असतानाच बँकेचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. बँकेने जिल्ह्यातील 40 कोटींची एक सूतगिरणी अवघ्या 14 कोटींत विकल्याचे समोर आले आहे.
Sangli District Central Co-Operative Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची एकीकडे सध्या चौकशी सुरु असतानाच बँकेचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. बँकेने जिल्ह्यातील 40 कोटींची एक सूतगिरणी अवघ्या 14 कोटींत विकल्याचे समोर आले आहे. आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे याबाबत शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाकडून माजी, आजी, सीईओंची चांगलीच कानउघाडणी करत अशा पद्धतीने 40 कोटींची सूतगिरणी अवघ्या 14 कोटींमध्ये विकणे हा व्यवहार नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे बँकेत (Sangli District Central Co-Operative Bank) मागील काही वर्षात कशा पद्धतीने नियमबाह्य कारभार केला जात होता हे समोर येऊ लागले आहे.
थकित कर्ज वसूल करण्यासाठी 40 कोटींची सूतगिरणी अवघ्या 14 कोटींमध्ये विकली
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने तब्बल 40 कोटी वाजवी किंमत असलेली आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी केवळ बँकेचे थकित कर्ज वसुल करण्यासाठी केवळ 14 कोटी रुपयांमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीला जिल्हा बँकेने आधी मध्यम मुदत कर्ज दिले. या कर्जापोटी सूतगिरणीची जमीन व अन्य स्थावर, जंगम मालमत्ता तारण घेतली. या सूतगिरणीच्या आवारात विजयालक्ष्मी कॉटन मिल आहे. या मिलची मालमत्ताही बँकेच्या थकीत कर्जासाठी ताब्यात घेतली आहे.
मध्यम मुदत कर्ज फिटल्यानंतर सूतगिरणीला पुन्हा 10 कोटी रुपये माल तारण कर्ज दिले. यासाठी पूर्वी बँकेकडे तारण असलेलीच स्थावर व जंगम मालमत्ता पुन्हा तारण ठेवण्याचे पत्र सूतगिरणीने दिले. त्यानंतर 10 कोटींचे कर्ज थकित राहिले. व्याजासह ही रक्कम 14 कोटींच्या घरात गेली.
अवघ्या 14 कोटी रुपयांना विक्री
थकबाकी वसुलीसाठी बँकेने संस्थेचा लिलाव काढला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी अन्य संस्थांप्रमाणे ही संस्थाही बँकेच्या नावे खरेदी केली. दरम्यान, संस्थेची पुन्हा एकदा निविदा काढली. या निविदेत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीच्या स्थावर, जंगम मालमत्तेचे मूल्यांकन करुन सुमारे 40 कोटी रुपये वाजवी किंमत ठेवली. नियमानुसार 40 कोटींपेक्षा जास्त सर्वाधिक बोली असणाऱ्या निविदाधारकाला ही सूतगिरणी देणे आवश्यक होते. पण अवघ्या 14 कोटी रुपयांना तिची विक्री केली, पण सूतगिरणीवरच्या शासनाचे 25 कोटींच्या कर्जाचा विचार केला नाही.
त्यामुळे वस्त्रोद्योग मंडळाने नागपुरात झालेल्या सुनावणीवेळी बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांची कानउघाडणी करत हा व्यवहार नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या