Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
मुंबई : राज्यातील 29 महापालिका (Mahapalika) निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली असून मुदत संपलेल्या 27 महापालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या इचलकरंजी आणि जालना असा 29 महापालिकांसाठी आणि 2069 सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे (Election commission) आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. त्यासाठी, मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान (Voter) होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल. मुंबई महापालिकेसाठी वार्ड रचना असल्याने मतदारांना एक मत द्यायचं आहे, तर इतर महापालिकेत बहुसदस्यीय संख्या म्हणजेच प्रभाग रचना अस्याने तीन ते पाच मते द्यावी लागतील. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे 1. राज्यात महापालिका निवडणुकांसाठी एकूण 3.48 कोटी एकूण मतदार आहेत, त्यासाठी 39147 मतदार केंद्र असतील, मुंबईसाठी 10,111 मतदारकेंद्र, 11,349 कंट्रोल यूनिट आणि 22,000 बॅलेट यूनिट असतील. 2. 1 जुलै 2025 ची मतदार यादी अंमलात आणली जाईल. भारत निवडणूक आयोगाकडून यादी घेण्यात आली असल्याने नाव वगळण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत 3. दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे. तसेच, मतदान कुठे करणार हे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून घेण्यात आले आहे. 4. मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत, मुंबईतील यादीच्या 7 टक्के दुबार मतदार आढळून आले आहेत. दुबार मतदारांपैकी ज्यांचा सर्व्हे झाला नाही, त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतलं जाईल. 5. मुंबईतील निवडणुकांसाठी 290 अधिकाऱ्यांची नेमणूक असून राज्यात 870 अधिकाऱ्यांची नेमणूक, 1,96,605 कर्मचारी असणार आहेत. निवडणुकांसाठी 48 तास आधी प्रचारावर निर्बंध येतील. त्यानंतर, जाहिरातींवर बंदी असेल 6. राज्यातील 29 महापालिकेच्या 2869 जगांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये, 1442 महिला, 341 अनुसूचित जाती, 77 अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग 759 अशी सदस्यसंख्या असेल. 7. नागपूर आणि चंद्रपूरसह काही महानगरपालिकांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आरक्षण 50 टक्क्यांवर चात असले तरी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा महानगरपालिकांच्या निवडणुका तात्काळ कंडक्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 8. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसंदर्भात ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका घेण्याचे सर्वोच्च आदेश आहेत, अशा 12 जिल्हा परिषदा आहेत, त्यांच नियोजन सुरू आहे. 31 जानेवारीच्या आधी त्याही निवडणुका घ्यायच्या आहेत. 9. प्रचारासाठी राजकीय पक्षांकडे केवळ 29 दिवस 10. असा असेल महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम? ⦁ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर ⦁ अर्जाची छाननी - 31 डिसेंबर ⦁ उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी ⦁ चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी ⦁ मतदान - 15 जानेवारी ⦁ निकाल - 16 जानेवारी





















