Dhairyasheel Mane on Naga Panchami : बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीला परवानगी द्या; खासदार धैर्यशील माने यांची संसदेत मागणी
Dhairyasheel Mane on Naga Panchami : बत्तीस शिराळ्याच्या ऐतिहासिक अशा नागपंचमीला परवानगी द्या आणि नागाला वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत केली.
Dhairyasheel Mane on Naga Panchami : पूर्वापार सुरू असलेल्या शिराळ्याच्या ऐतिहासिक अशा नागपंचमीला परवानगी द्या आणि नागाला वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत केली. नागाचे वास्तव्य मनुष्यवस्तीच्या जवळपास आहे. त्यामुळे इंडियन कोब्रा म्हणजेच नाग हा प्राणी वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळण्यात यावा अशी विनंतीही खासदार धैर्यशील माने यांनी केली.
सांगली जिल्ह्यातील शिराळ्याची नागपंचमी ही भारतीय संस्कृतीची एक वेगळी ओळख असून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेला जतन करणे गरजेचे आहे. मात्र काही वादामुळे आणि प्रकारामुळे या नागपंचमी सणावर मागील काही वर्षांपासून निर्बध आहेत. नागपंचमीला नाग पूजेला असणाऱ्या बंदीबाबत मुद्या उपस्थित करत खासदार धैर्यशील माने यांनी काही मागण्या आणि विनंती केली.
सुब्रमण्यम समितीने भारतीय सण, उत्सव, परंपरा यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सुचविले आहे, याचाही दाखला माने यांनी दिला. शिराळामध्ये नागपंचमीदिवशी नागाला हाताळून त्यास इजा पोहचविणे किंवा त्याच्या जिवितास धोका निर्माण करण्याचा कोणताही प्रकार नागभक्तांकडून उत्सवामध्ये होत नाही किंवा जाणीवपूर्वक केला जात नाही याकडे आपल्या भाषणात बोलताना खासदार माने यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
बत्तीस शिराळा हे संपूर्ण जगामध्ये नाग पंचमी सणादिवशी जिवंत नाग पूजेसाठी प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्याच्या पंचमीला शिराळा गावामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा महायोगी श्री शिव महाराजांनी 900 व्या शतकापासून सुरू केली. ही परंपरा सन 2002 पर्यंत सुरू होती. परंतु भारतीय वन्यजीव कायदा 1972 नुसार ही परंपरा खंडित झाली.
तथापि घटनेच्या मूलभूत हक्क संबंधी कलम 25 नुसार आवडीच्या धर्माचा व परंपरेचा आचार उच्चार व प्रसार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कलम 26 नुसार धार्मिक कार्याचे पालन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. "या आधारे नागपंचमीला परवानगी मिळणे आवश्यक आहे असे माने यांनी म्हटलं आहे.