(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हेअर कटिंगसाठी 200 तर दाढीसाठी 100 रुपये; सलून सुरु होण्यापूर्वीच दरात 20 ते 40 टक्के दरवाढ निश्चित
लॉकडाऊनच्या नियमांमधून शिथिलता मिळण्यापूर्वीच सलून व्यावसायिकांनी दरवाढ केलेली पाहायला मिळत आहे. लॉकडाऊननंतर सलून, ब्युटी पार्लरला शिथिलता मिळाल्यास खबरदारीचे उपाय अधिकाधिक करावे लागणार आहेत. त्यासाठी दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं सलून व्यावसायिकांचं म्हणणं आहे. पण सलून सुरु झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.
मुंबई : सलून, ब्युटी पार्लर मागील दोन महिन्यापेक्षा अधिक काळ पूर्णपणे बंद आहेत. ते सुरु करण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. तरीही सर्व खबरदारीचे उपाय करुन सलून सुरु करण्याची तयारी व्यवसायिकांनी दाखवली आहे. पण यामध्ये खबरदारी घेताना ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन, सलून सुरु होण्यापूर्वीच दरात 20 ते 40 टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली आहे.
सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी खुर्च्या कमी करुन खुर्च्यांमध्ये अंतर ठेवणे, मास्क सॅनिटायजरचा वापर करणे, पीपीई किटचा वापर करणे, अशा प्रकारचा खर्च वाढणार आहे. तर काही ठिकाणी काम करणारे लोक सुद्धा कमी करावे लागणार आहेत. त्यामुळेच ही दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं सलून व्यवसायिकांचं म्हणणं आहे.
आता हे दर प्रत्येक दुकानावर अवलंबून असतील. पण तुम्ही सर्वसाधारण एसी सलूनच्या दराचा विचार केला तर हे दर अशाप्रकारे वाढणार आहे.
काम आधीचे दर आताचे दर हेअर कटिंग 80 ते 100 रुपये 150 ते 170 रुपये शेविंग 40 ते 50 रुपये 80 ते 100 रुपये फेशियल 500 ते 700 रुपये 800 ते 1000 रुपये हेअर कलर 350 ते 500 रुपये 600 ते 700 रुपये
इतकंच काय तर सलून सुरु झाल्यास गर्दी होऊ नये यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करुन सलून सुरु होण्यापूर्वी नियमावली आणि वाढीव दर ठरवल्याने आता फक्त सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी हे व्यावसायिक करत आहेत.
त्यामुळे लॉकडाऊनमध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ कात्री, वस्तराचं काम जरी बंद असलं, तरी ही कात्री जेव्हा केसातून चालायला सुरुवात करेल, तेव्हा तुमच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. कारण सलून व्यवसायिकांनी तुमच्या खबरदारीचा सर्व उपाययोजना केल्या आहेत. आता ते सरकारच्या निर्देशांची वाट पाहत आहेत.
Unlock 1.0 | केस कापण्यासाठी 200 तर दाढीसाठी 100 रुपये आकारणार; राज्यातील सलून असोसिएशनचा निर्णय