Barsu Refinery Protest : नारायण राणेंनी रिफायनरी स्थळी येऊन दाखवावं, विरोध काय असतो ते दाखवू; खासदार विनायक राऊतांचे आव्हान
Barsu Refinery Protest : रविवारी नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधकांना फटकारले होते. त्यानंतर आता खासदार राऊत यांनी आव्हान दिल्याने रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Narayan Rane : केंद्रीय मंत्री, भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरी होत असलेल्या बारसू गावात यावे, त्यांना विरोध काय असतो हे दाखवून देऊ असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिले आहे. रविवारी नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधकांना (Barsu Refinery Project) फटकारले होते. त्यानंतर आता खासदार राऊत यांनी आव्हान दिल्याने रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्यानिमित्ताने 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या निमित्ताने ठाकरे यांची चिपळूणमध्ये सभादेखील होणार आहे. त्यावेळी मैदानाची पाहणी केल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली.
नारायण राणेंना आव्हान
रविवारी, खेड बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपण कोकणात रिफायनरी करणारच असल्याचे म्हटले. रिफायनरीला विरोध करणाऱ्यांची ताकद किती आहे, त्यांनी चिवचिव करू नये अशा शब्दात राणे यांनी रिफायनरी विरोधकांना फटकारले. लोकहितासाठी, बेरोजगारी दूर करण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी रिफायनरी आवश्यक असल्याचे राणे यांनी म्हटले होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. नारायण राणेंमध्ये हिंमत असेल तर येत्या आठवड्यात रिफायनरी ज्या ठिकाणी तुम्ही आणू इच्छिता त्या बारसू मध्ये नारायण राणेंनी येऊन दाखवावं, असे आव्हान त्यांनी दिले. दलालांच्या हितासाठी केवळ आणि केवळ गुजराती आणी मारवाडी दलालांच्या हितासाठी नारायण राणे बारसूला रिफायनरी आणण्यासाठी प्रयत्नशील असतील तर आम्ही कोकणवासिय कसा विरोध करतो तो पहावे, असा इशाराही राऊत यांनी दिला.
नारायण राणे म्हणजे डबल ढोलकी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नारायण राणेंनी घेतलेल्या भूमिकेवरही खासदार राऊत यांनी टीका केली. नारायण राणे हे डबल ढोलकी आहेत. त्यांच्या खासदारकीचे शेवटचे दिवस राहिले आहेत. ते पुन्हा निवडून येणार नाहीत. मराठा समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी काय दिवे लावले पाहावे असा टोलाही राऊत यांनी लगावला.
मराठा आरक्षणासाठी केंद्राने कायदा करावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायची सरकारची खरोखर मानसिकता असेल तर भाजपने संसदेत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कायदा करावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.