Ratnagiri News : खेड तालुक्यातील शेलारवाडी-वाकी धरणाला गळती
Ratnagiri News : खेड तालुक्यातील माणी इथल्या शेलारवाडी-वाकी प्रकल्पातून गळती सुरु असल्याचं समोर आलं आहे. धरणाच्या पायथ्याशी वाहणारे झरे ही धरणाची गळती आहे की ड्रेनेज लाईन याबाबत पाहणी करुन चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील तिवरे धरण दुर्घटनेनंतर (Tiware Dam Burst) कोकणातील धरणांच्या सुरक्षेविषयी चर्चा सुरु झाली. जिल्ह्यात पूर्ण असलेल्या धरण प्रकल्पांमधील निम्मी धरणं नादुरुस्त आणि गळकी आहेत. आता यामध्ये आणखी एका धरणाची भर पडली आहे. खेड तालुक्यातील माणी इथल्या शेलारवाडी-वाकी (Shelarwadi-Waki) प्रकल्पातून गळती सुरु असल्याचं समोर आलं आहे.
धरणाच्या बंधाऱ्याची मुख्य भिंतीलाही गळती लागली असून पाटबंधारे विभागाने हे धरण फुटू नये, म्हणून मर्यादित पाणी साठा करायला सुरुवात केली आहे. या धरणाची पाणी साठवण उंचीची क्षमता 84 तालांका आहे. मात्र धरणफुटीच्या भीतीने आता प्रत्यक्षात या धरणात 70 तालांकापेक्षा जास्त पाणी साठवलं जात नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
गळती की ड्रेनेज लाईन याबाबत चौकशी करा : ग्रामस्थ
दोन वर्षांपूर्वी या धरणाच्या मुख्य बंधाऱ्याच्यामधून पाणी झिरपून मोठी गळती सुरु झाली होती. त्यानंतर धरणासमोर असलेल्या माणी बौद्धवाडीला धोका निर्माण होऊ नये म्हणून धरणाचा पाणीसाठा मर्यादित प्रमाणात साठवायला सुरुवात झाली. आता धरणाच्या मुख्य बंधाऱ्याच्या पायथ्याशी पाच ते सहा ठिकाणी पाण्याचे झरे वाहू लागले असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धरणाच्या पायथ्याशी वाहणारे झरे ही धरणाची गळती आहे की ड्रेनेज लाईन याबाबत पाहणी करुन चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप
वाकी नदीवर 2002 मध्ये शेलारवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरु झाले. हे धरण 2013 मध्ये पूर्ण झालं. या प्रकल्पाद्वारे 2014-15 मध्ये पाणी अडवण्याचं काम सुरु करण्यात आलं. 2019 पर्यंत धरण प्रकल्पामध्ये पाणी अडवण्याचं काम चालू होतं. धरणात पाणीसाठा होत असल्याने ऐनवरे, माणी, सवेणी, हेदली, वेरळ आणि लवेल या सहा गावांची पाणीटंचाई दूर झाली होती. दरम्यान या धरणाचं काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करण्यात येत होता.
तिवरे धरणाची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच अपेक्षा : गावकरी
राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन पाण्याचा साठा करण्यासाठी धरणे निर्माण केली आहेत. परंतु पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे धरणं धोकायादय बनल्याचा अनुभव तिवरे धरण दुर्घटनेतून कोकणासह राज्यातील जनतेने अनुभवला आहे. त्यामुळे या दुर्घटनेची पुनरावृत्ती शेलारवाडी धरणाच्या बाबतीत होऊ नये अशी अपेक्षा इथले गावकरी करत आहेत.
संबंधित बातमी