Ratnagiri : रत्नागिरीतील एसटी सेवा ठप्प, सगळ्या बस चाकरमान्यांसाठी मुंबईला रवाना झाल्याने खोळंबा, खेड आगारात प्रवाशांचा संताप
Khed ST Depot : खेड आगारातील सर्व गाड्या या मुंबईला पाठवण्यात आल्याने ग्रामीण भागातील सर्व सेवा ठप्प झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी रत्नागिरीतून शेकडो एसटी बस धाडण्यात आल्या आहेत. पण त्याचा परिणाम ग्रामीण भागातील सेवांवर झाल्याचं दिसून आलं. डेपोत एसटी बस नसल्याने खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील नियमित बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होत असून खेड आगारात गर्दीच गर्दी झाल्याचं चित्र आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईकडे धाडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बसेस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत.
विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा फटका
रत्नागिरीतील खेड तालुक्यात नोकरी, शिक्षण, दैनंदिन कामासाठी एसटी हा ग्रामीण भागाचा मुख्य आधार आहे. आता या आधारातील सर्व एसटी चाकरमान्यांना आणण्यासाठी मुंबईला गेल्याने त्याचा फटका खेडमधील विद्यार्थांना तसेच कामगारवर्ग आणि सर्वानाच बसल्याचं दिसून आलं.
या बससेवा रद्द केल्यामुळे खेड तालुक्यातून ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना मोठी रक्कम खर्च करुन खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांचा संताप
ग्रामीण भागात जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. आधीच ठराविक फेऱ्या या ग्रामीण भागामध्ये जातात, त्यात आता त्याही रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागासाठी किमान आवश्यक फेऱ्या कायम ठेवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कोकणात जाण्यासाठी 5,200 अधिकच्या बस
येत्या 27 तारखेला बाप्पाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघरमधून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणाकडे निघालेत आणि प्रवासासाठी त्यांनी आपली पसंती एसटीला दिली आहे. एसटीच्या 5 हजार 103 बसेस आरक्षणासह फुल्ल झाल्या असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलीय.
यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान मुंबईतून कोकणासाठी 5 हजार 200 अधिकच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणात जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक तैनात असेल तसंच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील दिव्यावरुन सावंतवाडीला जाणाऱ्या रेल्वेतून मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात दाखल झाले आहेत. वाहतूक कोंडीचा त्रास वाचविण्यासाठी अनेक कोकणवासीय रेल्वेने माणगाव रेल्वे स्थानकात दाखल झालेत. एसटी, रेल्वे मार्ग तसेच खाजगी वाहनांना देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कोकणवासीयांनी कोकणात जाण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा:























