पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
मोदी तेरी कबर खुदेगी, अशी घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यानंतर, भाजपकडूनही काँग्रेसवर जोरदार पलटवार करण्यात आला.

मुंबई : काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांनी गेल्या 8 दिवसांत दोनवेळा केलेल्या राजकीय वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. थेट देशाचा पंतप्रधान लवकरच बदलणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमातही त्यांनी पुनर्उल्लेख केला. देशाच्या पंतप्रधानपदी नागपुरातील भाजपच्या (BJP) नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी 19 तारीखही सांगितल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तर, भाजप नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर टीका करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत. त्यामुळे, त्यांचे वक्तव्य अनेकांना गंभीर वाटत आहे. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
मोदी तेरी कबर खुदेगी, अशी घोषणा दिल्लीत काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्यानंतर, भाजपकडूनही काँग्रेसवर जोरदार पलटवार करण्यात आला. काँग्रेसची विचारसरणी आणि मानसिकतेचं प्रदर्शन यातून होत असल्याचं भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देत काँग्रेसच्या नेत्यांचं हे वर्तन ही मूर्खपणाची घोषणा असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदाबाबत केलेल्या भविष्यवाणीवरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, त्यांना स्वप्न पडत होती हे आम्ही पाहिलेलं आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पीएमओचे मंत्री राहिले त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागला म्हणजे निश्चितच यात काहीतरी काळबेरं आहे. त्यामुळे, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच, असा विचार करुन त्यांनी स्वत:ला फार त्रास करुन घेऊ नये, असा माझा त्यांना सल्ला असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पृथ्वीराज चव्हाण ही संपलेली आवृत्ती
पृथ्वीराज चव्हाण ज्यांनी काँग्रेसचे वाटोळे केले, त्यांची काय अवस्था आहे. शिळ्या कढीला ऊत आणून स्वतःला महत्त्व मिळवून घेण्याचा प्रयत्न असून पृथ्वीराज चव्हाण ही संपलेली आवृत्ती आहे, अशा शब्दात आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. 19 डिसेंबरला देशात मोठी राजकीय घडामोड होऊन देशाला मराठी पंतप्रधान मिळेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये काँग्रेसमुक्त भारतची घोषणा केली होती, त्यावेळी याच पृथ्वीराज चव्हाण यांनी ती घोषणा इतकी मनावर घेतली की विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करुन दाखवला होता, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. तसेच, त्यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घेता ज्यांना त्यांच्या स्वतःच्या मलकापूर नगरपालिका निवडणुकीत पॅनल उभा करता आले नाही. कराड नगरपालिकेत अनामत रकमाही जप्त होतील त्यांनी काय बोलावे, असेही विखे पाटील यांनी म्हटले.
























