Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
Tarwade Bk Chalisgaon : शाळेतून परत येणारी चिमुकली अचानक गायब झाल्याने तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. तीन दिवस झाले तरीही पोलिसांना अद्याप शोध लागला नाही.

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक (Tarwade Bk Chalisgaon) या गावात धक्कादायक घटना घडली आहे. एक नऊ वर्षांची चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. धनश्री शिंदे असं बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव आहे. धनश्रीचे शाळेचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळून आलं. या घटनेला आता तीन दिवस उलटून गेली तरीही तिचा शोध लागला नाही.
धनश्री ही तरवाडे बुद्रुक गावातील शाळेत शिकत होती. 12 डिसेंबरला शाळा सुटल्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून तिचा तीन दिवसांपासून तिचा शोध लागला नाही. त्यामुळे धनश्रीचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
धनश्रीच्या वडिलांनी याबाबत एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, "धनश्री सकाळी 10 वाजता शाळेत गेली. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटली. त्यावेळी दोन मुलं घरी आली पण ती आली नाही म्हणून तिचा शोध घ्यायला शाळेकडे गेलो. तिकडे सापडली नाही म्हणून पूर्ण गाव शोधलं, पण ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर दोघा-तिघांना सागून शोधाशोध सुरू केली. त्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलिसांनीही शोध केला पण तिचा पत्ता लागत नाही."
Girl Missing In jalgaon : चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली
मुलीचे वडील याबाबत अधिकची माहिती देताना म्हणाले की, "एका ठिकाणी एक बाई बसली होती, तिच्याजवळ चौकशी केली. त्यावेळी आपल्या मुलीसोबत एक तांड्यातील मुलगी होती, ती तांड्याच्या दिशेने गेली असल्याचं त्या बाईने सांगितलं. दुसऱ्या एकाने तिच्याकडे चौकशी केली असता त्याला दुसरीच माहिती दिली. आपल्या मुलीसोबत इतर दोन मुली होत्या. एक गावातील आणि एक मुलगी तांड्यातील होती अशी माहिती त्या बाईने दिली. तर एका चुलत भावाने पुन्हा तिच्याकडे चौकशी केली असता तिसऱ्यांदा तिने आणखी वेगळं उत्तर दिलं. आपली मुलगी कडगाव रस्त्याच्या दिशेने गेली असल्याचं त्या बाईने सांगितलं. त्यामुळे आमची दिशाभूल झाली."
गेल्या तीन दिवसांपासून धनश्री बेपत्ता असल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावात ठाण मांडून आहेत. एलसीबी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांची विचारपूस केली आहे. पोलीस प्रशासनाकडून चिमुकलीचा कसून घेण्यात येत आहे.
ही बातमी वाचा:























