थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
गंभीर जखमी झालेल्या प्रकाश सावंत यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सावंत हे सुमारे 50 ते 60 टक्के भाजल्याचे समजते.

Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर आज (15 डिसेंबर) खळबळजनक घटना घडली. प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. ही घटना न्यायालय परिसरात घडल्याने अनेकांची भंबेरी उडाली. घटनेनंतर उपस्थितांनी आणि सुरक्षारक्षकांनी तत्काळ धाव घेत कोटने तसेच पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या प्रकाश सावंत यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सावंत हे सुमारे 50 ते 60 टक्के भाजल्याचे समजते.
जागेच्या वादातून प्रकार घडल्याची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणात प्रकाश सावंत यांनी एका वकिलाला एकूण 6 लाख 80 हजार रुपये दिले होते. यापैकी 6 लाख रुपये वकिलाने परत केले असून उर्वरित 80 हजार रुपये देण्यास वकिलाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. या आर्थिक वादातूनच सावंत यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
वृद्धाचा जिवंत जाळून खून!
दरम्यान, एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाचा खून केला. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत हा गुन्हा उघड करत आरोपीला ताब्यात घेतले. औसा तांडा येथील रहिवासी असलेला गणेश चव्हाण एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. अनेक आर्थिक व्यवहार अडचणीत आले होते, फ्लॅटचे हप्तेही थकले होते. या संकटातून सुटका मिळवण्यासाठी त्याने आधी एक कोटी रुपयांचा विमा उतरवला आणि नंतर स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला.
औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी अचानक पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान गणेश चव्हाण याच्या कॉल डिटेल्स तपासण्यात आल्या. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आणि अखेर अवघ्या 24 तासांत गणेश चव्हाण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. स्वतःच्या मृत्यूचा बनाव करून तो फरार झाल्याचे उघडकीस आले. तुळजापूर टी-पॉईंट परिसरात लिफ्ट मागणाऱ्या गोविंद यादव (वृद्ध) याला त्याने गाडीत बसवले. पुढे त्याचा खून करून मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवण्यात आला आणि गाडीला आग लावण्यात आली. आपणच मृत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आरोपीने स्वतःचे कडे मृतदेहाजवळ ठेवले होते.
इतर महत्वाच्या बातम्या























