सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र बदलणार, 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम प्रभावीपणे राबवणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Shasan Aplya Dari : आम्ही 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहे, मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ताच म्हणून काम करतोय असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
रत्नागिरी: 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हे चित्र बदलणार असून आम्ही 24 तास काम करतोय असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत विविध शासकीय योजनेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा रत्नागिरी दौरा होता.
रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रंही देण्यात आली. सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र आता बदलणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थितांना दिला. आम्ही 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहोत, मुख्यमंत्री असलो तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला मदत करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतल्या नऊ तालुक्यांमधून दहा हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित होते.
नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा शासन आपल्या दारी या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. यासाठी सुमारे 75,000 स्थानिकांना लाभ वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनांना त्यांच्या संबंधित भागात दोन दिवसीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ही बातमी वाचा: