Ratnagiri Fishing : रत्नागिरीत ताजे फडफडीत मासे मिळण्यास सुरुवात, बांगडा, कोळंबीचे दर परवडणारे, तर सुरमई, पापलेट, हलवा महाग; काय आहेत माशांचे दर?
Ratnagiri Fishing : रत्नागिरीत मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छिमारांच्या जाळ्यात बांगडा आणि प्रॉन्स जातीचे मासे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत.
Ratnagiri Fishing : कोकणात (Konkan) जवळपास दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारी पुन्हा सुरु झाली आहे. दरम्यान, रत्नागिरीत (Ratnagiri) मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छिमारांच्या (Fisherman) जाळ्यात बांगडा (Mackerel) आणि प्रॉन्स (Prawn) जातीचे मासे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. पण त्याचवेळी सुरमई, पापलेट, हलवा या माशांचे दर चढे आहेत. असं असलं तरी बाजारात मासे खरेदीसाठी सध्या चांगलीच गर्दी दिसून येत आहे. सध्या समुद्र देखील काही प्रमाणात खवळलेला आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटिंगची संख्या कमी आहे. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक आणखी वाढू शकेल अशी शक्यता आहे.
दोन महिन्यांनंतर मासेमारी सुरु
जून आणि जुलै महिन्यात बंद असलेली मासेमारी ऑगस्ट महिन्यापासून सुरु होते. पण यंदा समुद्र काही प्रमाणात खवळलेला असल्याने यांत्रिक बोटी अद्यापही समुद्रात गेलेल्या नाहीत. दरम्यान, ज्या बोटी समुद्रात जात आहेत त्यांच्या जाळ्यात बांगडा बंपर प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे, बांगड्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळते. सध्या जेट्टीवर बांगडा 80 ते 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर इतर माशांचे भाव मात्र चढेच आहेत.
सध्याचे माशांचे दर
बांगडा - 80 ते 100 रुपये किलो
कोळंबी - 250 ते 300 रुपये किलो
टायगर प्रॉन्स - 500 ते 550 रुपये किलो
सुरमई - 800 ते 1000 रुपये किलो
पापलेट - 700 ते 800 रुपये किलो
मोडोसा - 600 रुपये किलो
हलवा - 600 ते 800 रुपये किलो
बोंबील - 230 ते 300 रुपये किलो
सौंदल - 300 ते 330 रुपये किलो
उपद्रवी काटेरी केंड माशांमुळे मच्छिमार हैराण
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला काटेरी केंड मासे जाळ्यात मिळत असल्याने मच्छिमार हैराण झाले आहेत. हे मासे निरुपयोगी असल्याने या माशांना खड्डा तयार करुन पुरुन टाकावे लागत आहे. या माशांचं बाह्य अंग काटेरी असल्याने हे मासे जाळ्यातून सोडवताना देखील मच्छिमारांचा कस लागतो. तसेच हे केंड मासे जाळ्यात अडकल्यावर जाळ्यातील इतर माशांवर तुटून पडतात. त्यामुळे जाळ्यांचं आणि सापडलेल्या इतर माशांचं नुकसान होतं. म्हणून या केंड माशाला उपद्रवी मासा म्हटलं जातं. या काटेरी केंड माशांना किनाऱ्यावर सोडल्याने ते मरुन दुर्गंधी पसरते म्हणून मच्छीमार या माशांना खड्डा खोदून पुरुन टाकतात. केंड मासा पाण्याबाहेर आला की फुटबॉलप्रमाणे फुगतो. याला इंग्रजीत पफर फिश किंवा फुगू फिश असं संबोधलं जातं.
संबंधित बातमी