मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजापूर दौऱ्यावर, रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत काय भूमिका घेणार? मतदार संघांचे काय आहे महत्त्व?
लोकसभा मतदारसंघात नेमका कुठल्या पक्षाचा उमेदवार असणार? याची चर्चा अगदी जोरात सुरू आहे. नाक्यानाक्यावर तर्तवितर्क बांधले जात आहेत. अशा सर्व घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणारा दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर इथं दौरा होणार आहे. शिवसंकल्प अभियानातंर्गत रत्नागिरी - सिंधुदुर्ग (Ratnagiri- Sindhudurg) या लोकसभा मतदारसंघासाठी राजापूर इथं शिवसंकल्प अभियान होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जाहीर सभा देखील घेणार आहेत. सध्या लोकसभेच्या याच जागेवरून भाजप - शिवसेनेत धुसफुस सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. खुद्द किरण सामंत यांनी तशी जाहिर कबुली देखील दिली आहे. कार्यकर्ते जोरदार बॅनरबाजी, समाजमाध्यमांवर भावी खासदार असा उल्लेख देखील करत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे अगदी आठवड्याभरापूर्वी खुद्द किरण सामंत यांनी मी किरण रविंद्र सामंत...रोकेगा कौन ? असं व्हाट्सअप स्टेटस ठेवलं होतं. त्याच दिवशी भाजप देखील रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करत असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची बाब समोर आली.
लोकसभा मतदारसंघात नेमका कुठल्या पक्षाचा उमेदवार असणार? याची चर्चा अगदी जोरात सुरू आहे. नाक्यानाक्यावर तर्तवितर्क बांधले जात आहेत. अशा सर्व घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणारा दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणून तसेच पक्षाचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाबाबत काय भूमिका घेणार? राजापूर इथल्या सभेत जाहीर करणार का? कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच प्रमुख नेत्यांना काय आदेश देणार? याची उत्सुकता सध्या राजकारणाशी निगडित असलेल्या प्रत्येकाला लागून राहिली आहे. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा महत्त्वाचा आहे.
राजापूर इथल्या सभेचा नेमका अर्थ काय असू शकतो?
- राजापूर इथं होणारी सभा हि रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर होणार आहे. राजापूर हे शहर दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या विविध भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना हे ठिकाण सोयीचं पडणार आहे.
- शिवसेनेत फुट पडली. पण, त्यानंतर देखील राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. शिवाय, साखरपा - लांजा - राजापूर या भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षित असा सध्या तरी मिळत नसल्याचं चित्र प्राथमिक सध्या आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेत कार्यकर्ते दाखल झाल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे शक्तीप्रदर्शनाच्या दुष्टीनं देखील राजापूर हे ठिकाण महत्त्वाचं आहे.
- महायुती म्हणून देखील आजघडीला एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची राजकीय ताकद किमान दिसून येत नाही. त्यामुळे देखील कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी राजापूर हे ठिकाण महत्त्वाचं आहे.
- या मतदारसंघाचा विचार केल्यास पूर्वी म्हणजेच 2008 सालापर्यंत राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हणून या लोकसभा मतदारसंघाची ओळख होती. पण, 2008 साली राजापूर मतदारसंघ रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुके तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापू, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण या तालुक्यांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. त्यामुळे या संघाची व्यापी देखील मोठी आहे.
- लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती आणि भौगोलिक स्थिती पाहता कोकणातील दोन महत्त्वाचे जिल्हे अर्थात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघात मोडतात. त्यामुळे राजकीय दुष्ट्या कोकणातील ताकद दाखवण्यासाठी देखील सदरचा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे.
- सुरूवातीच्या काळात प्रजा समाजवादी पक्ष, त्यानंतर काँग्रेस आणि सध्या शिवसेनेचं वर्चस्व या मतदारसंघावर दिसून येते. मुंबई, ठाण्यातील राजकीय गणितं आणि वर्चस्वाचा विचार केल्यास या ठिकाणी प्राबल्स असणं देखील महत्त्वाचं मानलं जातं. सध्या विनायक राऊत हे या ठिकाणी खासदार असून त्यांची साथ हि उद्धव ठाकरे यांना आहे.
- 1657 - 1967 या काळात प्रजा समाजवादी पक्षाते बॅरिस्टर नाथ पै यांनी या मतदारसंघाचे नेतृत्न केले आहे. नाथ पै यांच्यानंतर 1971 - 1989 या काळात मधु दंडवते यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. 1991 मध्ये काँग्रेसचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी खासदार म्हणून नेतृत्व केले आहे. त्यानंतर या मतदारसंघावर शिवसेनेनं प्राबल्य मिळवलं आहे. 1996 ते 2009 या काळात सुरेश प्रभू खासदार म्हणून निवडून आले. प्रभू सध्या भाजपमध्ये आहेत. दरम्यान, 2009 मध्ये नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांनी प्रभू यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते. पण, 2014 मध्ये शिवसेनेचे विनायक राऊत खासदार म्हणून विजयी झाले. सध्या राऊत यांची साथ उद्धव ठाकरे यांना आहे.
- वरील उलथापालथी पाहता कोकणी माणसांची मिळणारी राजकीय साथ आणि मतांच्या रूपातील दान महत्त्वाचे आहे. शिवाय, विशेषता मुंबईतील मतांवर या ठिकाणचे पण सध्या मुंबईत स्थायिक झालेले मतदार परिणाम करतात.
- महत्त्वाची बाब म्हणजे रिफायनरी प्रकल्प किंवा जैतापूर अणुऊर्जा सारखे प्रकल्प देखील राजापूर पासून जवळ मोडतात. हे दोन्ही प्रकल्प केवळ रत्नागिरी जिल्ह्याच्या नाही तर कोकणच्या, राज्य आणि देशाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. कारण जागतिक स्तरावरील गुंतवणूक तिथं येणार आहे.
कोण कुणास काय म्हणाले?
सध्या आरोप - प्रत्यारोप आणि दावे - प्रतिदावे पाहता 'राजकारण गाता गजाली' असं नक्कीच म्हणता येईल. कारण, सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेकडून किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांनी याबाबत आपली भूमिका देखील जाहिर केली आहे, त्याचवेळी भाजपनं देखील डाव टाकला आहे. रविंद्र चव्हाण यांचं नाव पुढे आल्यानंतर किरण सामंत यांनी 'चव्हाण मला मोठ्या भावाप्रमाणे आहेत. वरिष्ठांनी सांगितल्यास मी त्यांचा प्रचार करेन' अशी प्रतिक्रिया दिली. त्यादरम्यान 'टिवटिव करणाऱ्यांची तोंडं बंद होतील' अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.यानंतर लगेचच भाजप आमदार नितेश राणे यांनी भाजपची असलेली मतांची आकडेवारी सादर केली. सदरची आकडेवारी काही लाखांमध्ये असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. या सर्वांवर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना विचारल्यानंतर 'गद्दारांना लोक धडा शिकवतील' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा :