CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले.

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं होतं, राज्यभरातून शेतकऱ्यांच्या (Farmers) मदतीसाठी मागणी करण्यात येत होती. अतिवृष्टीनंतर विरोधकही आक्रमक झाले होते, तर राज्य सरकार देखील केंद्राच्या मदतीकडे आस लावून बसले होते. त्यातच, राज्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत निधी देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामार्फत करण्यात आलं होतं. तसेच, या मदतनिधीमधून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, आरटीआयमधून मिळालेल्या माहितीने विधिमंडळ सभागृहात आज चांगलाच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. माजी विधानपरिषद सभापती अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी ट्विट करुन धक्कादायक आकडेवारी समोर आणली. आता, दानवेंच्या या ट्विटला सीएमओ कार्यालयाने उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण, राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75 हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? असा सवाल अंबादास दानवे यांनी ट्विट करुन विचारला होता. आता, दावनेच्या या ट्विटला उत्तर देताना मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित माहिती चुकीती आणि केवळ एका महिन्याची असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी आहे, अशी माहिती आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. याशिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते, असे प्रत्त्युत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं आहे.
श्री अंबादास दानवे जी,
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 11, 2025
एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर,… https://t.co/81EIolTYla
आरटीआयमधून माहिती समोर
दरम्यान, मराठवाड्यात महापूर वेळी बऱ्याच दानशूर लोकांनी मुख्यमंत्री सहाययता निधीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे जमा केले होते, तसा जीआर काढला होता शासनानेही की मुख्यमंत्री सहाययता निधीत शेतकऱ्यांसाठी मदत जमा करा. त्यानुसार, 100 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील लोकांनी दिलेले पैसे त्यापैकी शासनाने फक्त 75 हजार रुपये वाटले, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
























