Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या 16 दिवसांच्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेत तब्बल 15 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

Dharashiv News : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या 16 दिवसांच्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेत तब्बल 15 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान शहरी झोपडपट्टी भाग तसेच ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये मोहीम राबवली गेली. या तपासणीत 10,075 संशयित रुग्ण आढळून आले, त्यापैकी 141 जणांना कुष्ठरोगाचे निदान झाले. यापैकी 16 टक्के रुग्ण म्हणजे सांसर्गिक प्रकारातील असून ८४ टक्के रुग्ण असांसर्गिक प्रकारातील आहेत.
आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक रुग्णाच्या संपर्कातील कमीतकमी 30 जणांची तपासणी केली जात आहे, आणि येत्या आठवडाभरात उर्वरित संशयितांचीही तपासणी पूर्ण होईल. मोहीमेअंतर्गत आढळलेल्या रुग्णांवर ताबडतोब उपचार सुरू करण्यात आले आहेत. सांसर्गिक प्रकारातील रुग्णांना 12 महिने तर असांसर्गिक प्रकारातील रुग्णांना 6 महिने औषधोपचार दिले जात आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार, वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.
Leprosy News : कुष्ठरोग विभागाचे आवाहन
कुष्ठरोग विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अंगावर चट्टे, हात-पायांमध्ये मुंग्या येणे, त्वचेवर तेलकटपणा, भुवयाच्या केस गळणे यासारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात दाखवा. मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाने संशयित रुग्णांवर चट्ट्यावरील बधिरता, त्वचेवरील जंतू व मज्जातंतूची तपासणी करून कुष्ठरुग्ण ओळखले.
Leprosy News : चार वर्षातील आकडेवारी
मागील काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, 2022 मध्ये 213 रुग्ण, 2023 मध्ये 245 रुग्ण, 2024 मध्ये 44 रुग्ण, 2025 मध्ये आतापर्यंत 141 रुग्ण आढळले आहे. आरोग्य विभागाच्या सध्या सुरू असलेल्या मोहिमेमुळे कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे. विभागाने 2027 पर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Leprosy News : कुष्ठरोगाची लक्षणे काय?
- शरीरावरील त्वचेपेक्षा फिक्कट किवा लालसर रंगाचा त्रास ना देणारा, कुठलाही चट्टा/डाग.,
- तेलकट, गुळगुळीत, सुजलेली व लालसर त्वचा.,
- हात पायांना सुन्नपणा/बधिरता, स्पर्श ज्ञान नसणे, स्नायूंचा अशक्तपणा व डोळा, चेहरा, हात किवा पायांची विकृती.
इतर महत्त्वाच्या बातम्या























