'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
Vijay Wadettiwar on Soybean: विजय वडेट्टीवार यांनी हमीभावाचा मुद्दा उपस्थित करत कोणत्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

Vijay Wadettiwar on Soybean: सोयाबीनमध्ये सरसकट लूट सुरु आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरभरून सोयाबीन भारतात आणत आहेत. जर आता सोयाबीन खरेदी झाला नाही तर महिन्यात सोयाबीन हजारावर येईल लिहून ठेवा, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. वडेट्टीवार यांनी हमीभावाचा मुद्दा उपस्थित करत कोणत्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.
70 टक्के सोयाबीन परत केला जात आहे
विजय वडेट्टीवार म्हणाले की, यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला. काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. त्यांनी सभागृहात सांगितले की, 70 टक्के सोयाबीन परत केला जात आहे. म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावान खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे अशी विचारण त्यांनी केली. त्यांनी आयातीवर लावलेल्या कराबद्दलही प्रश्न विचारला. ते म्हणाले की, आयातीवर शून्य टक्के आयात कर केला आहे. 12 टक्क्यावरून तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करणार? अशीही विचारणा त्यांनी केली.
सोयाबीन खरेदीत अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा
दरम्यान, सोयाबीन खरेदीवरून भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला. त्यांनी विदर्भात कापूस खरेदीची सुद्धा परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सीसीआय नाममात्र खरेदी करत आहे. कृषी खात्याने काहीही केलेलं नाही. सोयाबीन खरेदीत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणा असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, सरकारला नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी लवकर सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. यासंदर्भात नाफेडची एक महत्त्वाची बैठकही झाली आणि मी स्वतः त्या बैठकीत उपस्थित होतो. सोयाबीन खरेदी प्रक्रियेत दोन स्तरांवर ग्रेडर असतो. एक खरेदी केंद्रावर आणि दुसरा गोडाऊनवर.
परंतु, ग्रेडिंगच्या नावाखाली मोठा गैरप्रकार सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आले. खरेदी केंद्रावरील ग्रेडर माल पास करत असला, तरी गोडाऊनवर नाफेडचा ग्रेडर तोच माल नाकारत होता. दोन ट्रक नाकारले की खरेदी-विक्री संघांची आर्थिक परिस्थिती एवढी बेताची असते की १५-२० लाखांचा माल खरेदी करून ठेवण्याची त्यांची क्षमता नसते. यावर उपाय म्हणून नाफेडला सुचवले की खरेदी केंद्रावर आणि गोडाऊनवर दोन्ही ठिकाणी नाफेडचेच ग्रेडर नेमावेत. तरीही अडचणी सुरूच राहिल्या. मी स्वतः खरेदी केंद्रावर गेलो, ते म्हणाले. तिथे सोयाबीनचा ओलावा 12 टक्के निघाला; पण फक्त तीन तासांनी गोडाऊनवर तोच ओलावा 13 टक्के दाखवला. एवढ्या कमी वेळात ओलाव्यात 1 टक्क्यांची वाढ कशी होऊ शकते? खोलात चौकशी केली असता लक्षात आले की खरेदी केंद्रावर आणि गोडाऊनवर वेगवेगळे ओलावा मोजणारे मीटर वापरले जात होते. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करत खरेदीची प्रक्रिया राबवली जात होती.
इतर महत्वाच्या बातम्या























