Ratnagiri News : गुहागर समुद्रकिनारी सिंगापूरचा बार्ज अडकला, इंधन नसल्याने प्रदूषणाचा धोका टळला
Barge Stuck In Guhagar Beach : गुहागर समुद्रकिनारी सिंगापूरमधील एका कंपनीचा मानवरहित बार्ज अडकला आहे. या बार्जमध्ये इंधन नसल्यामुळे समुद्रातील प्रदूषणाचा कोणताही धोका नाही, असं भारतीय तटरक्षक दलाने सांगितलं.
Barge Stuck In Guhagar Beach : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील जयगड बंदरावर गुहागर समुद्रकिनारी (Guhagar Beach) सिंगापूरमधील एका कंपनीचा मानवरहित बार्ज (Barge) अडकला आहे. या बार्जमध्ये इंधन नव्हतं. अवजड मशिनरी घेऊन हा बार्ज कोलंबोहून आफ्रिका खंडातील देश जिबूती इथे जात होता. परंतु खराब हवामान आणि समुद्रातील परिस्थितीमुळे बार्ज वेगळा झाला आणि मशिनरी बार्जवरुन समुद्रात पडली. यामुळे 8 जुलै 2022 रोजी भारतीय समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 200 नॉटिकल मैल अंतरावर बार्ज उलटला. सिंगापूरच्या कंपनीने 10 जुलै रोजी बार्ज बुडाल्याच्या शक्यतेची माहिती दिली. यानंतर भारतीय तटरक्षक दलाने सर्व खलाशांना इशारा देत बुडलेल्या बार्जचा शोध सुरु ठेवला.
हा बार्ज नऊ दिवस समु्द्राच्या लाटांचा मारा झेलत वाहून भारतीय समुद्रकिनाऱ्याच्या पूर्व दिशेने 200 मैल अंतरावर, अखेर 19 जुलै रोजी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. भारतीय तटरक्षक दलाने आधीच राज्यातील अधिकाऱ्यांना सतर्क केलं आहे.
हा बार्ज सिंगापूरची कंपनी कॅपिटल नेव्हिगेशन पीटीई लिमिटेडचा आहे, ज्याने टग मॅरीगोल्ड आणि साल्वोर (ब्रँड मरीन कंसल्टंट, मुंबई) घटनास्थळी पाठवले आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या विनंतीवरुन टग मॅरीगोल्ड आणि साल्वोर यांना बुडालेल्या बार्जची विल्हेवाट लावण्यासाठी ठेवले आहेत. या बार्जमध्ये कोणतंही इंधन नव्हतं. त्यामुळे समुद्रातील प्रदूषणाचा कोणताही धोका नाही, असं भारतीय तटरक्षक दलाने सांगितलं.
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही समुद्रकिनारी सध्या तेलाचा तवंग असल्याचं बोललं जात आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातला समुद्र हद्दीत सिंगापूरमधील एका कंपनीचा बार्ज उलटला आणि त्यातील तेल सध्या समुद्रकिनारी पसरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबतचे नमुने सध्या तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. प्रदूषण मंडळांना मात्र हा तेलाचा तवंग नसून शेवाळचा एक प्रकार आहे. त्याचा कोणताही धोका समुद्रजिवांना नाही. मच्छीमारांनी किंवा स्थानिक आणि त्याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटलं आहे. अर्थात याबाबतचे नमुने तपासल्यानंतरच नेमकी माहिती समोर येणार आहे. सिंगापुरी कंपनीचे बार्ज खोल समुद्रात उलटल्यानंतर ते सध्या गुहागर तालुक्यातील पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर आले आहे.