Konkan Railway: कोकण रेल्वे 13 तास उलटूनही ठप्प, प्रवासी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अडकून पडले, वाहतूक कधी सुरु होणार?
Landslide on Konkan railway: दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन चिपळूण, खेड आणि रत्नागिरी स्थानकांत अडकून पडल्या आहेत. 13 तास उलटूनही कोकण रेल्वे ठप्प आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल
चिपळूण: जोरदार पावसामुळे खेडानजीक दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी ठप्प झाली होती. त्यामुळे 13 पेक्षा अधिक तासांपासून कोकण रेल्वेचे प्रवासी अडकून पडले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर (Konkan Railway) अनेक ठिकाणी एक्स्प्रेस ट्रेन जागच्या जागी उभ्या आहेत. यापैकी कोचीवेल्ली एक्स्प्रेस ट्रेन (Konakn Express Trains) गेल्या 13 तासांपासून चिपळूण स्थानकात उभी आहे. सुरुवातीला प्रवाशांना ही ट्रेन 4 तास उशिराने धावणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारची सकाळ उजाडली तरी ही एक्स्प्रेस ट्रेन चिपळूण स्थानकातच उभी आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
कोकण रेल्वेकडून गाडी चार तास उशीरा आहे, असे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर रात्रभर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता सकाळपासून मुंबईला जाण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये असणारी प्रवाशांची प्रचंड संख्या पाहता एसटी बसेसची व्यवस्था कितपत पुरी पडणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. काल रात्रीपासून कोचीवेल्ली एक्सप्रेसमध्ये रेल्वेकडून प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी किंवा खाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. याशिवाय, ट्रेनमधील शौचालयात पाणी नसल्याने स्त्री-पुरुष प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या सगळ्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी प्रचंड संतापले आहेत.
कोकण रेल्वेची वाहतूक कधी सुरु होणार?
खेड आणि विन्हेरे दिवाणखाटी या स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे माती रुळावर येऊन कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक कधी सुरु होणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे. ताज्या माहितीनुसार, कोकण रेल्वेकडून वाहतूक 8 वाजेपर्यंत सुरु होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, प्रवाशांकडून याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अनेक एक्स्प्रेस ट्रेन या ट्रॅकवरच अडकून पडल्या आहेत. त्यांना मागे किंवा पुढे जाणे शक्य नाही. त्यामुळे श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे.
रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांतील अनेक नद्यांना पूर आला होता. काल चिपळूण शहरात वासिष्ठी नदीचे पाणी शिरले होते. सध्या पावसाचा जोर ओसरल्याने रस्त्यांवर साचलेले पाणी कमी झाले आहे. मात्र, आजही रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगडमधील शाळांनाही सुट्टी देण्यात आलेली आहे.
कोकण रेल्वेचे प्रवासी रात्रभर ट्रेनमध्येच बसून, पाहा व्हीडिओ
आणखी वाचा