Bharat Gogawale vs Anand Paranjpe: राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी; आनंद परांजपेंच्या टीकेला गोगावलेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Bharat Gogawale vs Anand Paranjpe : भरत गोगावले सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील सात दिवसामध्ये बाहेर काढणार आहोत, असे आनंद परांजपे यांनी म्हटले होते.

Bharat Gogawale vs Anand Paranjpe : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांवर 'थ्री इडीयट्स' असा उल्लेख करत टीका केली होती. आता मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे निकटवर्तीय आणि रायगडचे युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी आनंद परांजपे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, अशी अवस्था आनंद परांजपे यांची झाली असून वेडी लोकच इतिहास घडवितात, असा इशारा त्यांनी आनंद परांजपे यांना यावेळी दिला. परांजपे यांची आमदारकारीसाठी धडपड सुरू आहे आणि त्यामुळेच ते असे वक्तव्य करत असल्याची टीका विपुल उभारे यांनी आनंद परांजपे यांच्यावर केली आहे.
कोणी काही चुकीचे केले असेल तर त्यासाठी जसे करावे तसे भरावे, अस सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले होते. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यासह रायगडच्या तीनही शिवसेना आमदारांवर निशाणा साधला. आता पुन्हा रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट असं शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.
सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी
रायगडचे युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे म्हणाले की, सुनील तटकरे यांच्या सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातील आरोप शिवसेनेकडून कधीच झाले नाहीत तर असे आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आले. त्यामुळे ज्यांनी आरोप केलेत त्यांच्या सोबत तुम्ही राज्याच्या सत्तेमध्ये आहात हे विसरू नका. त्यामुळे जर का राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर त्यांनी राज्याच्या सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी.
घोटाळे वाटत असतील तर...
मंत्री भरत गोगावले यांचे घोटाळे यांचे बाहेर काढण्यासाठी 7 दिवस नाही तर 7 जन्म सुद्धा पुरणार नाहीत. भरत गोगावले यांनी गाव खेड्यात केलेल्या विकास कामांना घोटाळे तुम्ही कसे काय म्हणत आहात? घोटाळे वाटत असतील तर मंत्री भरत गोगावले यांची कोणतीही चौकशी लावा. आम्ही त्या चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असा इशारा विपुल उभारे यांनी आनंद परांजपे यांना दिला आहे.
नेमकं काय म्हणाले होते आनंद परांजपे?
आनंद परांजपे म्हणाले होते की, खासदार सुनील तटकरे यांच्या भाची सुनेचा विमान अपघातात मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंब अद्याप त्या दुःखातून सावरलेले नाही. मात्र, दुसरीकडे भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी बोलताना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला. परंतु, सिंचन घोटाळ्याची फाइल कुठे अडकली असेल तर ती त्यांनी बाहेर काढावी. भरत गोगावले यांची गुन्हेगारी प्रवृत्ती, रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील सात दिवसामध्ये बाहेर काढणार आहोत. सुनील तटकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम या 'थ्री इडियट' कडून राहिलेला आहे. विधानसभेत सुनिल तटकरे यांनी युती धर्माचे पालन केले. युती धर्माचे पालन केले नसते तर भरत गोगावले काय अजून दोन उमेदवार पडले असते. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर होती. त्यावेळी मतदारसंघात केलेल्या आपल्या कामाच्या जोरावर सुनिल तटकरे हे निवडून आले आहेत. मात्र हे 'थ्री इडीयट्स' बेछूट आरोप करत आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
























