Bharat Gogawale vs Anand Paranjpe : शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस वाढली! भरत गोगावलेंचा घोटाळा बाहेर काढणार, आनंद परांजपेंच्या आरोपावर गोगावलेंचा पलटवार; म्हणाले, एक जरी घोटाळा...
Bharat Gogawale vs Anand Paranjpe : जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असताना भरत गोगावले यांनी भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आनंद परांजपे यांनी केलाय.

Bharat Gogawale vs Anand Paranjpe : रायगडच्या 'थ्री इडियट्स' मधल्या एका 'इडियट्स'ने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याविरुद्ध गरळ ओकली असून त्या 'इडियट्स' ची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना दिला. तर एक जरी घोटाळा आनंद परांजपे यांनी बाहेर काढून दाखवला तर मी आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असा पलटवार भरत गोगावले यांनी आनंद परांजपे यांच्यावर केलाय. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस वाढल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाले आनंद परांजपे?
आनंद परांजपे म्हणाले की, खासदार सुनील तटकरे यांच्या भाची सुनेचा विमान अपघातात मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंब अद्याप त्या दुःखातून सावरलेले नाही. मात्र, दुसरीकडे भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी बोलताना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला. परंतु, सिंचन घोटाळ्याची फाइल कुठे अडकली असेल तर ती त्यांनी बाहेर काढावी. भरत गोगावले यांची गुन्हेगारी प्रवृत्ती, रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील सात दिवसामध्ये बाहेर काढणार आहोत. सुनील तटकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम या 'थ्री इडियट' कडून राहिलेला आहे. विधानसभेत सुनिल तटकरे यांनी युती धर्माचे पालन केले. युती धर्माचे पालन केले नसते तर भरत गोगावले काय अजून दोन उमेदवार पडले असते. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर होती. त्यावेळी मतदारसंघात केलेल्या आपल्या कामाच्या जोरावर सुनिल तटकरे हे निवडून आले आहेत. मात्र हे 'थ्री इडीयट्स' बेछूट आरोप करत आहे, असे त्यांनी म्हटले.
भरत गोगावलेंचा पलटवार
तर भरत गोगावले म्हणाले की, आता प्रत्येकजण आपापल्या परीने सांगतो. त्यांना पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यावरून जे काही टोचतंय त्यांनी माझे 100 टक्के घोटाळे बाहेर काढावेत. जर घोटाळे बाहेर काढले तर मी मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा देईल. भरतशेठनी स्वतः काय केलंय हे त्यांनी सांगावं. मग मी मंत्रिपदाचा आमदारकीसहित राजनामा देईन आणि जर घोटाळा केला नसेल तर आनंद परांजपे हे त्यांच्या तोंडाला काळ फासून घेणार का? असा आव्हान त्यांनी यावेळी दिले.
आणखी वाचा




















