(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nira River Pollution : पंचगंगा, कृष्णेनंतर आता नीरा नदीपात्रात मृत माशांचा खच; साखर कारखान्यांच्या प्रदूषणाने नदी पात्रे होऊ लागली 'विषाचा प्याला'
Nira River Pollution : आता नीरा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. फलटणमधील होळ गावापासून ते आसू गावापर्यंत नदी पात्रातील पाणी प्रदूषित झालं आहे. त्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला आहे.
Nira River Pollution : पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून होत असलेल्या प्रदूषणाने (Pollution)नदीकाठचा परिसर आणि जलचरांसाठी अक्षरश: 'विषाचा प्याला' होऊन गेला आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीत लाखो माशांचा तडफडून झालेला मृत्यू ताजा असतानाच आता नीरा नदीपात्रात मृत माशांचा (Dead Fish) खच पडला आहे. साताऱ्याच्या (Satara) फलटणमधील होळ गावापासून ते आसू गावापर्यंत नदी पात्रातील पाणी प्रदूषित झालं आहे. त्यामुळे हजारो माशांचा (Fish) मृत्यू झाला आहे.
दूषित पाण्यामुळे मृत पावलेले मासे विकण्यासाठी नागरिकांची चढाओढ
माशांचा तडफडून मृत्यू होत असताना काही लोकांनी तेच मासे टेम्पो भरुन विकण्यासाठी नेले आहेत. त्यामुळे एकप्रकारे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. नदी प्रदूषित झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कारखान्यातील दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याने असे प्रकार घडत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. नीरा नदीपात्र परिसरात चार साखर कारखाने आहेत.
होळ येथे नीरा नदीत अनेक मासे मरुन पडले आहेत. होळ येथील बंधाऱ्यावर स्वच्छ पाण्याच्या दिशेने जाण्यासाठी मासे झुंडीने निघाले होते, पण उंचावरुन पाणी पडत असल्याने त्यांचा प्रवास थांबला आणि माशांच्या समूह पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुरुम बंधाऱ्यात स्वच्छ पाणी तर पुढील होळ कोऱ्हाळे खुर्द भागातील बंधाऱ्यात दूषित पाणी आहे. यामुळे माशांचा प्रवास दूषित पाण्याकडून स्वच्छ पाण्याकडे सुरु होता.
कारखान्यांकडून दूषित पाणी नदीत सोडण्याचे प्रमाण वाढले
कारखान्यांकडून गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणी सोडण्याचे प्रमाण वाढले आहेत. चार दिवसांपासून वरील मुरुम बंधाऱ्यातील पाणी खाली होळ बंधाऱ्यात उंचावरुन पडू लागले आणि माशांच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला. स्वच्छ पाणी पडत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुंडीने मासे येऊ लागले. पशुपक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होऊ लागल्यामुळे लोकांचे लक्ष गेले. मोठ्या प्रमाणात मासे आहेत याची माहिती नदीकाठच्या लोकांना मिळाली आणि लोकांनी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली.
नदी पात्र परिसरात असलेल्या चार साखर कारखान्यांची नावे
1 सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
2 श्रीदत्त इंडीया साखर कारखाना जुने नाव न्यू फलटण शुगर वर्कस साखरवाडी
3 श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखाना
4 माळेगाव सहकारी साखर कारखाना
VIDEO : Phaltan Fish Death : फलटणमधील नीरा नदीपात्रात हजारो माशांचा मृत्यू, दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच
इतर महत्वाच्या बातम्या